Join us

Exclusive : स्वप्निल बनला सूत्रसंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:07 IST

प्राजक्ता चिटणीस कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाचे तिसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेच्या यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन ...

प्राजक्ता चिटणीस कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाचे तिसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेच्या यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी करणार आहे. स्वप्निल या कार्यक्रमाचा भाग होणार असल्याने या कार्यक्रमाला चार चाँद लागणार यात काही शंकाच नाही. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा मी मोठा फॅन होतो असे स्वप्निल सांगतो. स्वप्निल त्याच्या या नव्या इनिंगसाठी खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, मी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रेमात होतो. बच्चनसाहेबांच्या या कार्यक्रमाचा कधीतरी भाग व्हायला मिळावे अशी माझी नेहमीच इच्छा होती. त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीच्या प्रतिनिधींनी मला ज्यावेळी फोन केला, त्यावेळी मी खूपच खूश झालो. माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली असल्याचे मला वाटले. कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाची संकल्पना ही मुळची परदेशातील असल्याने या कार्यक्रमाचा सेट, मेकअप, वेशभूषा या गोष्टी सगळ्या मूळ कार्यक्रमाप्रमाणेच असतात. त्यामुळे कोण होईल मराठी करोडपती हा कार्यक्रमही भव्य असणार आहे. तसेच माझ्या इमेजचा साजेशी अशी माझी या कार्यक्रमात वेशभूषा असणार आहे. हा कार्यक्रम हा केवळ रिअॅलिटी शो नसून माणसाच्या मनाला जोडणारा हा मार्ग आहे. या कार्यक्रमाच्या अगोदरच्या पर्वांचा विचार करता या कार्यक्रमात अनेकजण आपल्या भावनांना वाट करून देतात. त्यामुळे हा कार्यक्रम खूपच स्पेशल आहे. माझे माझ्या फॅन्सशी नाते हे कधीही कोणत्याही अभिनेत्यासारखे नसून माझ्या फॅन्सना मी त्यांच्या घरातलाच वाटतो. कोणाला मी त्यांना त्यांचा भाऊ वाटतो, तर कधी कोणाला त्यांचा मुलगा, कोणाला मित्र. आज इतक्या वर्षांत माझ्या फॅन्ससोबत माझे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाद्वारे माझ्या फॅन्सच्या अधिक जवळ जाईन असे मला वाटते.