भारतीय टेलिव्हिजनवरील मालिका या केवळ उतारवयातील लोकांसाठी असतात असेच म्हटले जाते. पण हीच गोष्ट बदलण्यासाठी झी युवा वाहिनी प्रयत्न करणार आहे. या वाहिनीवर तरुणांना आपलेसे वाटणारे अनेक कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्याचपैकी लव लग्न लोचा ही एक मालिका आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे सक्षम कुलकर्णी, विवेक सांगळे आणि ओमकार गोवर्धन तसेच या मालिकेच्या शीर्षकगीताचे संगीतकार विशाल-बिपीन यांनी नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मालिकेविषयी तर गप्पा मारल्या. पण त्याचसोबत सध्या टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांवर आपली परखड मते व्यक्त केली.
सक्षम कुलकर्णी, विवेक सांगळे आणि ओमकार गोवर्धन हे लव लग्न लोचा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सक्षमने बालकलाकार म्हणून पक पक पकाक, दे धक्का यांसारख्या मालिकेत काम केले आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आंबट गोड ही मालिकादेखील केली होती. पण लव लग्न लोचा या मालिकेद्वारे एक अभिनेता म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर विवेक सांगळेची देवयानी ही मालिका प्रचंड गाजली होती. आजही लोकांमध्ये तो एक्का या त्याच्या व्यक्तिरेखेनेच ओळखला जातो. ओमकारने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण छोट्या पडद्यावर काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.
तरुणवयातील मंडळींसाठीच नव्हे तर मनाने तरुण असणाऱ्यांसाठीदेखील आमची मालिका असल्याचे सक्षम सांगतो. लव लग्न लोचा या मालिकेत प्रेक्षकांना तीन वेगवेगळ्या शहारातून मुंबईत आलेल्या मुलांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिन्ही कलाकार हे तरुण आहेत. आजच्या तरुणांना रडक्या, सासू-सूनेंच्या मालिकाच आवडत नाही असे हे तिघेही सांगतात. आजच्या मालिका या सद्यपरिस्थितीवर भाष्य करत नाहीत असे या तिघांचेही म्हणणे आहे. विवेक आजच्या मालिकांविषयी मत मांडताना सांगतो, आज आपण आपल्या आयुष्यात जे जगत आहोत, ते आपल्याला मालिकांमध्ये पाहायला नक्कीच आवडेल. पण आजच्या मालिका पाहाताना या गोष्टी खऱ्या आयुष्यात कधी घडू शकतात का असाच प्रश्न आपल्याला पडतो. मालिकेचे कथानक हे टीअारपीनुसार वारंवार बदलण्यात येते. त्यामुळे मालिकेची कथा ही कधी भरकटते हे कळतदेखील नाही. विवेकच्या या मतावर सक्षम पूर्णपणे सहमत होता. तो सांगतो, मी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत असलो तरी मला परदेशातील मालिका पाहायला अधिक आवडतात. मुख्य म्हणजे त्या खूपच कमी भागांच्या असतात आणि त्यांची संकल्पना खूप चांगली असते. त्या मालिकांमधून आपल्याला काही ना काही तरी शिकायला मिळते. विशेष म्हणजे या मालिका एका ठरावीक वळणावर आणून संपवल्या जातात आणि यामुळेच त्याच्या पुढच्या सिझनसाठी लोक आतुरतेने वाट पाहात असतात. आपल्याकडे अशा प्रकारच्या मालिका बनण्याची अत्यंत गरज आहे. पण आपल्याकडे असे काही घडताना दिसतच नाहीये. लव लग्न लोचा ही मालिका स्वीकारताना ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवर एक बदल घडवेल असे वाटत असल्यानेच मी ही मालिका स्वीकारली. ही मालिका पाहाताना ही आपल्या आयुष्यात घडणारी घटना आहे असे प्रत्येकालाच वाटेल. तसेच ही मालिकादेखील काही ठरावीक भागांची असेल असे आधीच ठरलेले आहे. त्यामुळे कोणती व्यक्तिरेखा मालिकेत शेवटपर्यंत कशाप्रकारे दाखवली जाईल हे आम्हाला चांगले माहीत आहे असेही तो सांगतो. सक्षमच्यामते नव्वदीच्या दशकात खूपच चांगल्या मालिका बनवल्या जात असत. त्यामुळे सगळ्याच वयोगटातील लोक त्या मालिका आनंदाने बघत असत. या विषयी तो पुढे म्हणतो, देख भाई देख, हम पांच या मालिका केवळ उतारवयातील लोकच नव्हे तर सगळ्याच वयोगटातील लोक न चुकता पाहात असत. पण आजची पिढी ही वेब सिरिजकडे वळलेली आहे. त्यांना पुन्हा मालिका बघायला लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ओमकारने या सगळ्या चर्चेत खूपच चांगला मुद्दा मांडला आहे. सासू-सूना किंवा सद्यपरिस्थितीशी संबंधित नसलेल्या मालिकांपेक्षा एक वेगळा प्रयोग आम्ही करत आहोत. पण तो बदल स्वीकारण्याची प्रेक्षकांनी मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. आज प्रेक्षक मालिका बघत असल्यानेच कोणताही तर्क नसलेल्या मालिका टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल ठरत आहेत. पण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे प्रेक्षकांचा मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडातरी बदलला असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच या मालिकेनंतर आता प्रेक्षक नव्या, फ्रेश विषयांवरच्या मालिका आनंदाने पाहातील अशी आशा करायला हरकत नाही.
ओमकार जाहिरातक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाची भूमिका या मालिकेत साकारत आहे. ओमकारला मालिकेत काम करण्यात काहीच रस नव्हता. पण या मालिकेची संकल्पना आवडल्यामुळे या मालिकेत काम करण्याचा विचार केला असे ओमकार सांगतो. या मालिकेत विवेक प्रेक्षकांना नाचतानाही दिसणार आहे. याविषयी विवेक सांगतो, मी कधी नृत्य करण्याचा विचारही केला नव्हता. पण या मालिकेसाठी विचारण्यात आल्यानंतर मी खास नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. मी दिवसांतून सात-आठ तास तरी नृत्याची प्रॅक्टिस करत असे. त्यामुळे आता मी चांगले नृत्य करू शकतो असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला आहे. माझ्या टीमकडूनही मला खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तर सक्षम या मालिकेत अतिशय लाजाळू मुलाची भूमिका साकारत आहे. सक्षम त्याच्या आयुष्यातही काहीसा तसाच असल्याने त्याला ही व्यक्तिरेखा साकारणे सोपे जातेय असे तो सांगतो. या मालिकेचे चित्रीकरण सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या तिघांची चांगलीच मैत्री जमली आहे. त्यामुळे आमची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांनाही मालिकेत पाहायला मिळेल अशी या तिघांनाही खात्री आहे. या मालिकेच्या शीर्षकगीताचीही सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या गीताला विशाल-बिपिन या जोडीने संगीत दिलेले आहे. या मालिकेचा विषय ऐकताच मला तो भावला आणि त्यामुळे या मालिकेसाठी चांगले गीत मी लिहू शकलो आणि त्याला चांगले संगीत मी आणि बिपिन देऊ शकलो असे विशाल सांगतो.