Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिंग सिद्धूची होणार हर मर्द का दर्द या मालिकेत एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:31 IST

नवज्योत सिंग सिद्धू गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना द कपिल शर्मा शोमध्ये पाहायला मिळत आहे. कपिलच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल ...

नवज्योत सिंग सिद्धू गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना द कपिल शर्मा शोमध्ये पाहायला मिळत आहे. कपिलच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमातदेखील तो झळकला होता. सिद्धू एक प्रसिद्ध क्रिकेटर असण्यासोबतच राजकीय नेता आहे. त्याने लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर तो बिग बॉस या रिअॅलिटी शोचा भाग बनला. आज त्याच्याशिवाय कपिल शर्मा शोचा प्रेक्षक विचारदेखील करू शकत नाही. सिद्धू आता हर मर्द का दर्द या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.या कार्यक्रमातून स्त्रिया काय विचार करतात हा प्रत्येक पुरुषाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मालिकेतील कथा एका पंजाबी कुटुंबातील असून या मालिकेला मिळणारी नाट्यमय वळणे, स्त्रियांना काय हवे आहे याचे पुरुषांमध्ये असलेले कन्फ्युजन या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळते. आता या मालिकेत नवज्योत सिंग सिद्धूची एंट्री होणार असून तो या मालिकेत विनोद खन्ना म्हणजेच फैजल रशिदचा बेस्ट फ्रेंड माँटी उर्फ करण सिंग छाब्राच्या वडिलांच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही कारणास्तव करणच्या वडिलांना विनोद आणि सोनूच्या लग्नाला येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता ते त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याचे कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.नवज्योत सिंग सिद्धूने रिअॅलिटी शो, कॉमेडी स्टेज शोमध्ये काम केले असले तरी कोणत्याही मालिकेत काम करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.