Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालिकावधू फेम फरनाझ खानची वारिसमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 16:03 IST

फरनाझ खानने दिल की नजर से खुबसुरत, बालिकावधू, एक वीर की अर्दास... वीरा यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तिने ...

फरनाझ खानने दिल की नजर से खुबसुरत, बालिकावधू, एक वीर की अर्दास... वीरा यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तिने साकारलेली बालिकावधू या मालिकेतील भूमिका तर खूपच गाजली होती. आता ती वारिस या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण या मालिकेतील तिची भूमिका ही खूपच वेगळी असणार आहे.वारिस ही मालिका लवकरच 10 वर्षांचा लीप घेणार आहे. या मालिकेत सध्या मनू नावाची मुलगी मुलगा म्हणून वावरत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या मुलीची लहानपणीची भूमिका सानिया तौकिरने साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता लीपनंतर सानिया साकारत असलेली मनू ही भूमिका फरनाझ साकारणार आहे. फरनाझदेखील या मालिकेत मुलाच्या वेशभूषेतच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेत फरनाझच्या सौंदर्याला अजिबातच वाव मिळणार नसला तरी ही एक चांगली भूमिका असल्याने या मालिकेत काम करण्याचा तिने विचार केला. या भूमिकेविषयी फरनाझ सांगते, "माझी ओळख ही माझ्या सौंदर्यासाठी नव्हे तर माझ्या कामासाठी व्हावी असे मला नेहमीच वाटते. मला ही एक वेगळी भूमिका साकारण्याची जी संधी मिळत आहे. त्यासाठी मी खूपच खूश आहे. या मालिकेच्या ऑडिशनचा अनुभव खूप वेगळा होता. मी या ऑडिशनला जाताना माझ्या भावाचा कुर्ता आणि कडा घातला होता. मी ऑडिशन खूप चांगले दिल्याने या मालिकेसाठी माझी निवड करण्यास आली. ही मालिका स्वीकारण्याआधीच मला माझ्या भूमिकेची चांगली कल्पना आली होती. सध्या या भूमिकेसाठी मी माझ्या देहबोलीवर आणि आवाजावर अधिक मेहनत घेत आहेत. या मालिकेची कथा खूप चांगली असून माझी भूमिका ही खूप सशक्त आहे."