आशीर्वाद, कोशिश एक आशा या मालिकांतील अभिनयामुळे अभिनेत्री संध्या मृदुल लोकांच्या घराघरात पोहोचली. यानंतर साथिया आणि पेज 3सारख्या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक झाले. बऱ्याच वर्षानंतर संध्या पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेद्वारे छोट्या पदड्यावर पुनरागमन करते आहे . यानिमित्त लोकमत सीएनएक्सने तिच्याशी साधलेला हा खास संवाद.
तू बऱ्याच वर्षांनी छोट्या पदड्यावर परतते आहेस. पुनरागमनासाठी पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के याच मालिकेची निवड का केलीस?
मी कोणतीही भूमिका चोखंदळपणे निवडते. माझ्या कुटुंबातले बरेचजण भारतीय सैन्यात आहेत. लहानपणापासून मी भारतीय सैन्याबद्दल ऐकत आले आहे. त्यामुळे मला ही भूमिका जवळची वाटली. दरम्यानच्या काळात मला हव्या तशा स्क्रिप्ट मिळत नव्हत्या. मला जी भूमिका साकारताना कंटाळा येणार नाही आणि प्रेक्षक मला त्या भूमिकेत बघून कंटाळणार नाहीत अशा भूमिकेच्या मी शोधात होती. मला सासू सूनेवाल्या भूमिका करायच्या नव्हत्या. प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील अशी भूमिका करायची असल्यानेच मी या मालिकेची निवड केली.
या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
नाझनीन खानची भूमिका मी या मालिकेत साकारते आहे. नाझनीनचा नवरा भारतीय सैन्यात असतो. कारगिल युद्धात तिचा नवरा गायब होतो आणि शत्रूच्या हाती सापडतो. 17 वर्षं तो पाकिस्तानच्या बंदिवासात असतो. ती या संपूर्ण काळात पतीची घरी परत येण्याची वाट बघत असते. या मालिकेची पटकथा, माझी भूमिका वाचतानाच मी अतिशय भावूक झाले होते. नाझनीन या मालिकेत खूप धैर्यवान दाखवली आहे तिच्याप्रकारे मीही धैर्यवान आहे. ही भूमिका साकारताना मी नाझनीनशी एकरूप झाले आहे. बरेच वेळा मी सीनमधून बाहेर पडू शकत नाही. सीन शूट झाल्यानंतरही मी रडत बसते. चित्रीकरण सुरू झाल्यापासून ते घरी जाईपर्यंत मी नाझनी असते.
अभिनेत्री म्हणून तुझ्या अभिनयातील स्ट्राँग पॉइंट तुला काय वाटतात?
मी खूप भावनिक आहे. पण तरीही मी माझा याला माझी कमतरता न समजता ती माझी ताकद समजते. मी प्रत्येक गोष्टीच्याबाबतीत खूप जागृक असते. आयुष्य मी खूप मोकळेपणे मला हवंय तसे जगते. समस्या आली तर मी पळून न जाता समस्येला धैर्याने सामोरे जाते.
जेव्हा तू अभिनय करत नसतेस तेव्हा तू काय करणे पसंत करतेस?
मला फिरायला प्रचंड आवडते. काम संपले की मी लगेच माझ्या कुटुंबियांना जाऊन दिल्लीला भेटते. मला पर्वतरांगामध्ये जाऊन राहायला खूप आवडते. निसर्ग जे काही तुम्हाला शिकवतं, ते जगातल्या कुठल्याच शाळेत तुम्हाला शिकता येत नाही असे मला वाटते. तसंच मी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून योगा शिकते आहे. त्यामुळे ऋषिकेश, योगापुरीला जाईन मी योगाचे कॅम्पदेखील अटेंड करते.
सिंगल स्टेटस तू एन्जॉय करते आहेस का?
खरं सांगू का? तर हो खूप जास्त. मला असे वाटते एकटेपणा आणि एकांत या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एका ठरावीक वेळेनंतर तुम्हाला यातला फरक समजतो आणि एकदा का तो समजला की, मग तुम्ही तुमची कंपनी एन्जॉय करायला लागता. सध्या मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आली आहे की, मी माझी कंपनी खूप जास्त एन्जॉय करू लागली आहे. तसंच माझ्यातील असुरक्षितेची भावना पूर्णपणे कधीच निघून गेलीय.