Join us

थ्री इडियट या चित्रपटात झळकलेला दुष्यंत वाघ दिसणार बॅटल ऑफ सरगारीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:28 IST

दुष्यंत वाघने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो हिंदी चित्रपटातही झळकला आहे. त्याने डोंबिवली फास्ट या ...

दुष्यंत वाघने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो हिंदी चित्रपटातही झळकला आहे. त्याने डोंबिवली फास्ट या चित्रपटात साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. थ्री इडियट या चित्रपटात त्याने साकारलेली सेंटिमीटर ही भूमिका तर चांगलीच गाजली होती. त्याने आजवर मन उधाण वाऱ्याचे, ना बोले तुम ना मैंने कुछ कहा, मेरे अंगने में यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दृष्यंत आता एका नव्या मालिकेत झळकणार असून त्याने या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. डिस्कव्हरी जीत या वाहिनीवर आता बॅटल ऑफ सरगारी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सैनिकांच्या जीवनावर असल्याने आजच्या छोट्या पडद्यावरच्या मालिकांपेक्षा ही खूप वेगळी मालिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या मालिकेत प्रेक्षकांना खूप चांगले कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत दुष्यंत एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दृष्यंत या मालिकेत सैन्यातील आचारीची भूमिका साकारणार आहे. तो सैन्यात असला तरी सैनिक नाहीये. त्यामुळे त्याला आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे अशी त्याची व्यक्तिरेखा असणार आहे. दृष्यंतची व्यक्तिरेखा काय असणार याविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेला अनेक छटा असल्याचे म्हटले जात आहे. डिस्कव्हरी जीत वरील बॅटल ऑफ सरगारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. डिस्कव्हरी जीत या वाहिनीवर पुढील काळात प्रेक्षकांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका पाहायला मिळणार आहेत. या वाहिनीवर बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका देखील सुरू होणार आहे. या मालिकेत बाबा रामदेव यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला जाणार आहे. या मालिकेची निर्मिती बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण करणार आहे. स्वामी रामदेवः एक संघर्ष असे या मालिकेचे नाव असून बाबा रामदेव यांनी आयुष्यात केलेला संघर्ष छोट्या पडद्यावर मालिकेच्या रूपाने मांडण्यात येणार आहे.