'सन मराठी'वर 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' (Tuzyasathi Tuzyasanga Serial) मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. मालिकेत तेजाची भूमिका अशोक फळदेसाई (Ashok Phal desai) तर वैदहीची भूमिका अनुष्का गीते (Anushka Gite) साकारत आहे. याच मालिकेत माईसाहेब ही खलनायिकेची दमदार भूमिका स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) साकारणार आहेत.
प्रोमो शूटिंगबाबत अभिनेता अशोक फळदेसाई म्हणाला, '''तुझ्यासाठी तुझ्यासंगं' मालिकेत तेजा ही भन्नाट भूमिका करत आहे. कब्बडीचा एक सीन शूट करत होतो. आधी प्रॅक्टिस केली, पण शूटमध्ये एक टेक असा गेला की मी अनुष्काला आउट करण्यासाठी लाथ मारली, आणि ती लाथ चुकवायची होती. पण लाथ अनुष्काच्या डोक्याला लागली. सगळं काही सेकंदात घडलं. मी अक्षरश: घाबरलो. अनुष्का डोकं धरून बसली, सेटवर सगळे धावत आले. मात्र अवघ्या दोन मिनिटात अनुष्का पुन्हा उभी राहिली आणि सीन पूर्ण केला. त्यानंतर माझ्याच पायाला सूज आली आणि मी पुढचे दोन दिवस लंगडत शूटिंग केलं. पण टीमने माझी खूप काळजी घेतली.''
अशोक पुढे म्हणाला की, ''तेजा ही भूमिका एकदम डॅशिंग आहे. मालिकेतून पहिल्या नजरेतलं प्रेम आणि त्याची सुंदर, निस्वार्थ कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. तेजाचं निरागस प्रेम वैदहीपर्यंत पोहोचत नाही, पण तो न थांबता तिच्या प्रेमासाठी लढतो. कधीतरी वैदहीचं मन तो नक्कीच जिंकेल. प्रेक्षकांनी आम्हाला आता जो प्रतिसाद दिला आहे, तो यापुढेही मिळेल याची पूर्ण खात्री आहे.'' प्रोमोमध्ये तेजाचं रांगडं व्यक्तिमत्त्व आणि वैदहीसाठीची त्याची निष्ठा प्रेक्षकांना भावत आहे. विशेष म्हणजे अशोक फळदेसाई या भूमिकेसाठी पूर्णपणे नव्या लूकमध्ये दिसतो आहे आणि त्याच्या स्क्रीन प्रेझेन्सला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.