Join us

​द ड्रामा कंपनी घेणार प्रेक्षकांचा निरोप... सुनील ग्रोव्हरचा हा कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 12:25 IST

द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक, अली असगर, डॉ. संकेत ...

द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक, अली असगर, डॉ. संकेत भोसले, सुगंधा मिश्रा असे कॉमेडीतील अनेक दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच मिथुन चक्रवर्ती देखील या कार्यक्रमाचा भाग आहे. त्यामुळे इतके चांगले कलाकार एकाच कार्यक्रमासाठी एकत्र आल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची सगळ्यांना खात्री होती. पण या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळत नाहीये. या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. हा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. टेलीचक्कर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत या कार्यक्रमाची निर्माती प्रीती सिमोननेच या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या कार्यक्रमाचे नेहमीच ठरावीक भाग असतात. त्यामुळे आमचा हा कार्यक्रम देखील या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. पण या ऐवजी सोनी वाहिनी कोणता कार्यक्रम आणणार याची मला कल्पना नाहीये.द ड्रामा कंपनी या कार्यक्रमाची जागा सुनील ग्रोव्हरचा एक नवा कार्यक्रम घेणार असल्याची चर्चा आहे. टेलिचक्कर या वेबसाईटच्या बातमीनुसार सध्या सुनील ग्रोव्हर आणि सोनी वाहिनीच्या टीममध्ये या कार्यक्रमावरून चर्चा सुरू आहे. सध्या कार्यक्रमाची संकल्पना काय असणार याबाबत त्यांचे बोलणे सुरू आहे. हा कार्यक्रम देखील एक कॉमिक कार्यक्रम असणार आहे. सुनील ग्रोव्हर द कपिल शर्मा शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत होता. त्याने साकरलेली डॉ. गुलाटी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. पण सुनील आणि कपिलच्या झालेल्या भांडणानंतर त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर सोनी वाहिनीच्या काही कार्यक्रमामध्ये सुनीलने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण सुनील मुख्य भूमिकेत असलेला एखादा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. या नव्या कार्यक्रमामुळे सुनीलच्या फॅन्सची इच्छा पूर्ण होणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. Also Read : सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख