Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, सागर देशमुखची होणार एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:30 IST

लवकरच अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्टार प्रवाहवरीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतून महामानवाची गौरवगाथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या बालपणीची भूमिका साकारली बालकलाकार अमृत गायकवाडने त्यानंतर बाबासाहेबांच्या बालरुपात श्रीहरी अभ्यंकरने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकेत कोर्लेकरने साकारलेल्या तरुणपणीच्या बाबासाहेबांच्या भूमिकेवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. लवकरच अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सागरच्या एण्ट्रीने मालिकेतही नवा अध्याय सुरु होणार आहे. 

पुढील शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांच्या अटीनुसार बाबासाहेबांना बडोद्याला नोकरी निमित्ताने जावं लागणार आहे. मात्र नोकरी करण्यास बाबासाहेबांच्या वडिलांचा नकार आहे. त्यामुळे सजायी राजेंना दिलेला शब्द पाळावा की वडिलांचं मन राखावं अशा द्विधा मनस्थितीत अडकलेले बाबासाहेब बडोद्याला जायचं ठरवतात. बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे रामजी बाबा दुखावतात. जातियतेचा विखारी अनुभव बडोद्यामध्येही येईल याची बाबासाहेबांना पुर्वसुचना देतात. मात्र बाबासाहेब सयाजीराजेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी बडोद्याला रवाना होतात. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत रमाई संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते. वचनपूर्तीसाठी कुटुंबाची होणारी ताटातूट बाबासाहेबांना अस्वस्थ करते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक प्रसंग मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

या नव्या अध्यायाविषयी सांगताना सागर देशमुख म्हणाले, ‘महामानवाची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. जबाबदारीचं ओझं असलं तरी ही हवीहवीशी वाटणारी जबाबदारी आहे. मनात सकारात्मक धाकधूक आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. प्रेक्षक मालिकेवर भरभरुन प्रेम करतच आहेत हा जिव्हाळा असाच कायम रहावा हीच अपेक्षा.’

तेव्हा डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण काळ अनुभवण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहात रहा.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्टार प्रवाह