Join us

गाव गाता गजाली या मालिकेचे गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय? हे गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 11:25 IST

​“गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?” हे सोनूच्या गाण्याचे मालवणी व्हर्जन गाव गाता गजाली या मालिकेच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रूपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रूपाची. आतापर्यंतच्या सोनूच्या सगळ्या गाण्यात सोनू तुझा माझ्यावर भरोवसा नाय काय? हे आपण ऐकले आहे. पण या मालवणी रूपात भरवशाचा प्रश्न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला जाणार आहे आणि हे गाववाले आहेत ‘गाव गाता गजाली’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतील गावकरी. मालवणातील गजालीची धमाल ‘गाव गाता गजाली’ या मालिकेतून बघायला मिळणार आहे. याच मालिकेच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ज्यात मालिकेतील एक महत्त्वाचे पात्र साकारणारा प्रल्हाद कुडतरकर हा गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय? असा प्रश्न विचारतोय आणि बाकी गावकरी त्याला साथ देतायत. प्रल्हादला आपण यापूर्वी रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडूच्या भूमिकेत पाहिले होते. याही मालिकेत तो एका खास भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकार हे प्रल्हादला साथ देताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकुळ घातला असून गाववाल्यांसाठीची ही मालवणी विनंती चाहत्यांना आवडत आहे.‘गाव गाता गजाली’ ही मालिका देखील या व्हिडीओप्रमाणे प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.