Join us

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आठवतेय का?, त्यांचा लेक 'आई कुठे काय करते' मालिकेत करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:12 IST

मराठमोळ्या या अभिनेत्रीची सूनदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी मालिका प्रसारित होत आहे. अवघ्या आठवड्याभरातच मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची जुळून येणारी केमिस्ट्री प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा दिव्या पुगावकर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या अगोदर तिने मुलगी झाली हो या मालिकेत काम केले होते. तिच्याशिवाय राजश्री निकम, नेहा वझे, रमेश वाणी, अश्विनी मुकादम, प्राणिता आचरेकर, रणजित जोग या कलाकारांची साथ मालिकेला लाभली आहे. सार्थकच्या वडिलांची भूमिका निनाद देशपांडे (Ninad Deshpande) यांनी साकारली आहे. 

निनाद देशपांडे हे मराठी नाट्य, मालिका अभिनेता आहे. आई कुठे काय करते या मालिकेत त्याने एक छोटीशी भूमिका केली होती. मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं प्रस्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या नाट्यप्रेमी सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांचा तो मुलगा आहे. पण हे मोठं नाव त्यांच्या पाठीशी असलं तरी निनाद यांनी स्वतःची ओळख स्वतः बनवावी अशी त्यांची धारणा होती. सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांनी अविष्कारची स्थापना केली होती. या संस्थेतून त्यांनी अनेक कलाकारांना घडवण्याचे काम केले आहे. बालनाट्यातून बालकलाकार म्हणून घडलेले हे कलाकार आज मराठी सिनेइंडस्ट्रीत नाव लौकिक करताना दिसतात. 

निनाद यांनी देखील आविष्कारमधूनच आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण या इंडस्ट्रीत जर यायचं असेल तर “तुला स्वत:ची ओळख स्वत:च बनवायची आहे. लागेल ती मदत आम्ही करू. पण तुला रोल द्या, असे कोणालाही सांगणार नाही. आम्ही दोघांनीही कोणाकडे काम मागितले नाही. स्वत:ला सिद्ध केले आणि लोक आमच्याकडे आले. तुझ्याकडून आमची तीच अपेक्षा आहे” अशी तंबीच त्यावेळी आई वडिलांकडून त्यांना मिळाली होती. त्यामुळे नाटकात चित्रपटात काम करत असताना ते कोणी खास आहेत अशी डोक्यात हवा गेली नाही. याचा परिणाम असा झाला की निनाद यांना आपली ओळख अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांच्याशिवाय मिळवावी लागली होती. अभिनेत्री अदिती मूलगुंड देशपांडे ही निनाद देशपांडेची पत्नी आहे. फुलाला सुगंध मातीचा, माय बाप, नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, रिश्ता लिखेंगे हम नया अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका