Join us

'मुलगी झाली हो'मधील गोंडस गोजिरीला ओळखलंत का?, यापूर्वी या मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:17 IST

Mulgi Jhali Ho: 'मुलगी झाली हो' मालिका ५ वर्षे लीप घेताना दिसली आहे. साजिरीला मुलगी झाली आणि ती पाच वर्षांची होऊन शाळेत देखील जायला लागली. मालिकेचा हा लीप रंजक वळण घेऊन आला आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मालिका 'मुलगी झाली हो' (Mulgi Jhali Ho) ५ वर्षे लीप घेताना दिसली आहे. साजिरीला मुलगी झाली आणि ती पाच वर्षांची होऊन शाळेत देखील जायला लागली. मालिकेचा हा लीप रंजक वळण घेऊन आला आहे. शौनक आता आपल्या लेकीच्या ओढीने पुन्हा एकत्र येणार असल्याची आशा प्रेक्षकांना वाटत आहे. दरम्यान मालिकेत छोट्या गोजिरीची एन्ट्री झाली आहे. गोजिरीची भूमिका साकारणारी ही चिमुरडी याआधीदेखील स्टार प्रवाहच्या एका मालिकेत पाहायला मिळाली होती. 

गोजिरीची भूमिका बालकलाकार आरोही सांबरे हिने साकारली आहे. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकली होती. यात तिने देवकीच्या मुलीची म्हणजेच कशिशची भूमिका साकारली होती. सुख म्हणजे नक्की असतं मालिकेतून आरोहीला मोठी लोकप्रियता मिळाली. यातूनच तिला स्टार प्रवाहच्या आणखी एका मालिकेत महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आपल्या बिनधास्तपणामुळे आरोहीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तिने साकारलेल्या गोजिरीच्या भूमिकेचे देखील खूप कौतुक होत आहे. शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून तिला सहभाग घेण्याची आवड आहे. मुलगी झाली हो मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मालिकेत पाहायला मिळालं की, शौनक साजिरीला सोडून अमेरिकेत निघून गेलेला असतो. मात्र आता तो गोजिरीला पाहून मायदेशी परतला आहे. इथेच त्याची अचानकपणे साजिरी सोबतही भेट घडून येते. गोजिरी रोखठोक बोलणारी मुलगी आहे आपला बाबा आपल्याला का भेटत नाही याचा तिला भयंकर राग आहे.दुसरीकडे शौनकच्या घरी मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे. दिव्या शौनक सोबत लग्न करायला तयार आहे. मात्र माझ्यासाठी तू थांबू नकोस मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही असे तो  तिला सर्वांसमोर स्पष्टपणे बोलताना दिसतो. त्यामुळे आता शौनक साजिरीला स्वीकारून पुन्हा एकत्र येणार का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
टॅग्स :स्टार प्रवाह