Join us

​​घाडगे & सून फेम भाग्यश्री लिमयेचे हे गुपित तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 14:25 IST

​घाडगे & सून या मालिकेद्वारे भाग्यश्री लिमयेने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेत ...

​घाडगे & सून या मालिकेद्वारे भाग्यश्री लिमयेने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेत ती साकारत असलेली अमृता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. चिन्मय आणि तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी भाग्यश्री ही प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. तुम्हाला तुमच्या या लाडक्या भाग्यश्रीबाबत एक गुपित आम्ही सांगणार आहोत. भाग्यश्री ही चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली गायिका आहे. तिचा आवाज खूपच चांगला आहे. त्यामुळे तिला तिच्या गाण्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. वेळात वेळ काढून पुढील वर्षात रियाज करण्याचा संकल्प तिने केला आहे. भाग्यश्रीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. तिचे हे स्वप्न २०१७ मध्ये पूर्ण झाले. आता या नंतर तिला तिच्या गायनाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. याविषयी ती सांगते, अभिनेत्री बनण्याचा प्रवास हा माझ्यासाठी सोपा नव्हता. या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे हे माझ्यासाठी खूप कठीण होते. अभिनयक्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत असताना मला अनेकवेळा अपयश आलं. अपयश आलं की मी लगेचच खचून जाते, ते माझ्या स्वभावातच आहे. पण माझ्या या स्वभावाला मुरड घालून यशस्वी होण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मी ऑडिशन देतच राहिले. अनेकवेळा मला ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आले. पण आलेल्या अपयशाने खचून न जाता मी अधिक उत्साहाने पुढची ऑडिशन्स देत राहिली आणि त्यामुळेच मला यश मिळाले. आज मी घेतलेल्या मेहनतीमुळेच मला घाडगे & सून या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. माझी ही भूमिका प्रेक्षकांना देखील आवडत आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे. आता अभिनयाप्रमाणेच मी माझ्या आवाजाकडे विशेष लक्ष द्यायचे ठरवले आहे. मी दररोज रियाज करण्याचा प्रयत्न करणार आहे. Also Read : घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!