Join us

तुम्हाला माहीत आहे का ​ससुराल सिमर का मधील परी म्हणजेच श्वेता सिन्हा ही मुळची नागपूरची असून खूप चांगले मराठी बोलते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 13:23 IST

ससुराल सिमर का या मालिकेत श्वेता सिन्हा परीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...

ससुराल सिमर का या मालिकेत श्वेता सिन्हा परीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. श्वेता ही कामाच्या निमित्ताने सध्या मुबंईत राहात असली तरी ती मुळची नागपूरची आहे. श्वेता ही महाराष्ट्रीयन असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिचे माहेरचे आडनाव समर्थ असून सिन्हा हे तिचे लग्नानंतरचे आडनाव आहे. तिचे वडील प्रकाश समर्थ हे व्यवसायिक होते. तसेच राजकारणात सक्रिय होते तर तिची आई कस्टममध्ये इन्सपेक्टर. ती मुळची मराठी असल्याने ती खूप चांगले मराठी बोलते. चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना श्वेताने आज छोट्या पडद्यावर तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. अभिनयक्षेत्रात जम बसवणे हे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. आपल्या स्ट्रगल दिवसांविषयी श्वेता सांगते, लहानपणापासून एअर होस्टेस, फॅशन डिझायनर, डान्स कोरिओग्राफर बनण्याची मला आवड होती. करियरच्या बाबतीत मला ग्लॅमरस फिल्डचेच आकर्षण होते असे तुम्ही म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण काही काळानंतर अभिनयातच मला रस असल्याचे मला जाणवले आणि माझ्या कुटुंबियांना मी याबद्दल सांगितले. त्यांनी देखील माझ्या या निर्णयात पाठिंबा दिला. पण ग्लॅमरस जगात प्रवेश करण्यासाठी मी कोणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे मी जाहिरातींसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी काही चांगल्या लोकांसोबत माझी ओळख झाली आणि मी त्यांच्यासोबत फोटोशूट केले. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण सुरुवातीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर मी केवळ ऑडिशनच द्यायचे. इतके ऑडिशन देऊनही काम मिळत नसल्याने अनेक वेळा माझी निराशा व्हायची. पण तरीही मी आशा सोडली नाही. अभिनय क्षेत्रातच करियर करायचे हे मनात ठरवून मी ऑडिशन देतच राहिले. काही काळानंतर मला कामं मिळायला लागली. पण अनेकवेळा माझी भूमिका ही केवळ एक-दोन दिवसांची असायची आणि त्यातही एडिटिंगनंतर भूमिका इतकी छोटी झालेली असायची की ते पाहून मलाच खूप वाईट वाटायचे. पण काहीही झाले तरी माघार घ्यायची नाही असेच मी ठरवले होते. पण नंतरच्या काळात माझ्या अभिनयक्षमतेमुळे मला चांगली कामे मिळायला लागली. मी इतकी वर्षं वाट पाहायची त्याचे मला फळ मिळाले. मयके से बंधी या मालिकेत मला एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मी या मालिकेत काम करत असतानाच ससुराल सिमर का या मालिकेसाठी मी रश्मी शर्मा टेलिफ्लिम्सच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑडिशन दिले आणि दुसऱ्या दिवशी मला प्रोडक्शन हाऊसकडून फोन आला की, माझी परी या भूमिकेसाठी निवड झाली आहे. त्यावेळी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्या मालिकेने माझ्या करियरला एक वेगळेच वळण दिले. लोकांनी माझ्या कामाची दखल घ्यायला सुरुवात केली. माझी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच मला या भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाले. नकारात्मक भूमिका म्हटली की, प्रेक्षक त्या व्यक्तिरेखेचा, कलाकाराचा राग करतात. पण एक कलाकारासाठी अशाप्रकारची भूमिका साकारणे हे आव्हानात्मक असते. ही भूमिका कधीही मालिकेतील नायक-नायिका यांच्या इतकीच सशक्त असते. आज या भूमिकेने मला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खास आहे. यासोबतच मी रॉनित रॉयसोबत एका रिअॅलिटी शो मध्ये काम केले होते. किचन चॅम्पियन मध्ये रोनितसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. छोट्या पडद्यावर स्त्रियांचा आज चांगलाच दबदबा आहे. अनेक मालिका या स्त्री केंद्री आहेत. त्यामुळे भविष्यात देखील मला खूप चांगल्या भूमिका साकारायच्या आहेत. नकारात्मक भूमिकेसोबतच एखाद्या कॉमिक भूमिकेत झळकण्याची माझी इच्छा आहे. Also Read : अभिनयक्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाहीः श्वेता सिन्हा