Join us

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत परत येण्यासाठी दिशा वाकानीला देण्यात आली नोटिस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 13:03 IST

आता प्रेक्षकांची लाडकी दया तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

ठळक मुद्देदिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी आता 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिले आहे. 30 दिवसांत दिशाने चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. 

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत असे. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी तिला काहीच तास चित्रीकरणासाठी बोलावले जात असे. या सगळ्यामुळेच तिला तिच्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधीपर्यंत चित्रीकरण करणे शक्य झाले होते. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. आता प्रेक्षकांची लाडकी दया मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जानेवारीत मीडियाशी बोलताना सांगितले होते की, दिशाचा करार अद्याप रद्द करण्यात आलेला नाहीये. तसेच दिशाच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला घेण्याचा अद्याप तरी आमचा काहीही विचार नाहीये. तिने कार्यक्रमात परतणे हे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तिला परत यायचे असल्यास तिचे स्वागतच आहे.

दिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी आता 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिले आहे. 30 दिवसांत दिशाने चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार आहे. 

दिशा वाकानी म्हणजेच दया तिच्या माहेरी गेली असल्याचे मालिकेत दाखवण्यात आलेले आहे. पण ही गोष्ट मालिकेत दाखवून देखील वर्ष झाले आहे आणि त्यात ही मालिका कॉमेडी असल्याने तिच्या व्यक्तिरेखेचे निधन झाल्याचे देखील दाखवणे अशक्य असल्याने दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले जात आहे. 

दिशा वाकानीने काही दिवसांपूर्वी तारक मेहता मधील एक दृश्य इन्स्टाग्रामला शेअर करून तुम्हाला हा सीन किती आवडला होता? असे विचारले होते.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा