अमेय सांगतो, '' दिल दोस्ती...ही मालिका भारतीय टेलिव्हिजनवर ट्रेंडसेटर मानली जाते कारण या मालिकेच्या धाटणीपासून ते तिच्या मांडणीमध्ये नवनवीन प्रयोग केले गेले. ही मालिका जेव्हा लॉन्च केली गेली होती तेव्हाच ती एक वर्ष चालेल असा अंदाज वर्तवला गेला होता. त्यामुळे मालिकेचा निरोप आमच्यासाठी नवीन नाही पण तिचा दुसरा सीझन लॉन्च होणे ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. ज्याचे श्रेय प्रेक्षकांना आणि मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमला दिले पाहीजे.'' खरेतर ही मालिका जेव्हा लॉन्च केली गेली तेव्हा इतर कौटुंबिक मालिकांपेक्षा काही तरी वेगळं आणि तरुणांसाठी काहीतरी बनवावे हा हेतू यामागे होता. मात्र आजही मालिका घराघरात आबालवृद्धांपासून सर्वचजण पहातात हेच याचे यश आहे. दिल दोस्ती...या मालिकेच्या नव्या सीझनची घोषणा झाली आणि प्रेक्षकांकडून चांगल्या वाईट प्रतिक्रीयांचा वर्षाव सुरु झाला. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी निर्णय बदलण्यासाठी कळकळीची विनंती. पण टीआरपीच्या शर्यतीत वरचढ असलेल्या या मालिकेने अशापद्धतीने निरोप घेणे ही मुळातच एक मोठी जोखीम मानायला हवी. खुद्द अमेयही या गोष्टीला पुष्टी देतो. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बंद करण्याचा निर्णय घेणे ही जोखीम आहेच ज्यासाठी चॅनल आणि मालिकेच्या निर्मात्यांची दखल घ्यायला हवी. पण आता या टप्प्यावर ही जोखीम घ्यायला आम्ही तयार आहोत. कारण आता दिल दोस्ती...चा एक मोठा चाहतावर्ग बनलाय आणि आम्हाला आमच्या चाहत्यांवर विश्वास आहे. खरेतर या मालिकेची धाटणी आणि याची संकल्पना पहाता इतर दैनंदिन मालिकांमध्ये या मालिकेची गणना होऊ शकत नाही. रेश्मा, कैवल्य, सुजय, अॅना, मीनल यांचे मालिकेमध्ये स्वतंत्र ट्रॅक आहेत पण तरीही मालिकेच्या प्रत्येक भागात एक वेगळा विषय सादर केला जातो. अशावेळी मालिकेचा हा सीझन संपवणे आणि सीझन २ आणणे ही या वेगळ्या धाटणीचीही मागणी आहे.दिल दोस्ती...ने यातल्या कलाकारांनाही यशाच्या शिखरावर नेले. मग ती मालिकेतली मीनल म्हणजे स्वानंदी टिकेकर असू दे किंवा सुजय म्हणजे सुव्रत जोशी असो. कैवल्य म्हणजेच अमेयलाही या मालिकेने एक नवी ओळख मिळवून दिली. खरेतर या सहा मित्रांमध्ये अमेय हा कलाकार म्हणून एकमेव अनुभवी चेहरा आहे. जोशी की कांबळे, पोपट, अय्या सारख्या मराठी सिनेमांमधून तसेच अनेक नाटकांमधूनही अमेयने आपले अभिनय कौशल्य दाखवले. पण दिल दोस्ती...च्या कैवल्यने अमेयला चाहत्यांच्या मनात खास जागा मिळवून दिली. ज्याबद्दल अमेय सांगतो, ''आयुष्यात नेहमीचा सरधोपट मार्ग स्विकारणारा मी कधीच नव्हतो. तसे केले असते तर फार आधीच समोर आलेल्या मालिकांच्या ऑफर्स स्वीकारुन मी या क्षेत्रात प्रस्थापित झालो असतो. मला अशाच मालिकेमध्ये काम करायचे होते जी पहायला मला स्वतःला आवडेल. दिल दोस्ती..ने उशिरा का होईना माझी ही इच्छा पूर्ण केली. आज जेव्हा प्रेक्षक मला भेटतात आणि त्यांना कैवल्यची व्यक्तिरेखा ही माझी पहीली भूमिका वाटते तेव्हा मला मनापासून आनंद वाटतो.'' ''आपण साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेमधून प्रेक्षकांना नव्याने भेटता यावे हेच स्वप्न प्रत्येक कलाकार उऱाशी बाळगून असतो, आज दिल दोस्ती..मुळे माझ्यातल्या या कलाकाराली मिळालेलीही पोचपावती आहे. ज्यासाठी मी या मालिकेचा सदैव ॠणी राहीन,'' असेही तो पुढे म्हणाला. दरम्यान कलाकारांचे मालिकेसोबतचे हे ॠणानुबंध इतक्यात नक्कीच संपणार नाहीये, कारण आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते दिल दोस्ती दुनियादारी सीझन २ चे.
“दिल दोस्ती…ने नवनवे ट्रेंड सेट केले, सीझन २ लॉन्च करणे हा याचाच भाग”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:45 IST