'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून अभिनेत्री पूजा ठोंबरे घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अॅना ही भूमिका साकारली होती. पूजाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स पूजा चाहत्यांना देत असते. मात्र, मॉर्निंग वॉकला गेलेल्या पूजाला वाईट अनुभव आला. हा अनुभव तिने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या पूजाकडे एक मुलगा एकटक बघत होता. एका काकांचा तो केअर टेकर होता. पूजाने काही वेळ त्याचं निरिक्षण केल्यानंतर त्या काकांकडे त्याची तक्रार केली. पण, त्या काकांनी मात्र तिला उलट उत्तर दिलं. हा संपूर्ण प्रसंग अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितला आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "सकाळी चालत असताना एक अंकलाचा केअर टेकर मी अगदी लांब जाईपर्यंत एकटक माझ्याकडे बघत होता. ३ राऊंड झाल्यावर त्याला झापलं आणि अंकलच्या ग्रुपकडे गेले हे बघायला की हा खरंच त्या अंकलसोबत आलाय का".
"तो एका अंकलसोबतच आला होता. अंकलला सगळं सांगितल्यावर ते म्हणाले अरे लडकियों को तो मै भी देखता हूं, इतना क्या...त्यावर बाजूचे दोन अंकल छान खुलून हसले. माझ्याच सोबत चालत असलेल्या मुलीकडे पण तो माणूस असंच बघत होता. ती म्हणाली मी ऐकलं तू जे बोलत होतीस, मी बोलले नाही कारण ते अंकल आणि मी एकाच सोसायटीमध्ये राहतो", असंही तिने पुढे म्हटलं आहे.
पुढे पोस्टमध्ये पूजा म्हणते, "तर हे सगळं यासाठी सांगितलं की मुलींनो असं होत असेल तुमच्यासोबत तर हे नॉर्मल आहे. त्याचा इश्यू करायची काहीही गरज नाही'.