एक दीवाना था या मालिकेच्या टीमला मनालीत आला हा वेगळा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 12:42 IST
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...
एक दीवाना था या मालिकेच्या टीमला मनालीत आला हा वेगळा अनुभव
एक दीवाना था ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दीवाना था या मालिकेला सध्या अनेक वळणं मिळत असून या मालिकेतील रहस्यमय थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत डॉनल बिष्ट, नमिक पॉल आणि विक्रम सिंह चौहान प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत मृत्यू झाल्यानंतरही आपल्या प्रेमावर हक्क सांगणाऱ्या एका प्रियकराची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एक दीवना था या मालिकेतील एका महत्त्वाच्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी अलीकडे मालिकेची संपूर्ण टीम मनालीच्या बर्फाच्छादित प्रदेशात गेली होती. क्रिएटिव्ह टीम कित्येक दिवसांपासून चित्रीकरणासाठी तिथे जागा शोधत होती. त्यांनी शोधलेल्या अनेक जागांमधून एका खास जागेची निवड करण्यात आली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ती जागा खरोखरच भूताखेतांनी झपाटलेली असल्याचे मानले जाते. या मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमला एका अशा जागी चित्रीकरण करायचे होते, ज्यामुळे प्रेक्षकांना थराराचा अनुभव घेता येईल. त्यामुळेच त्यांनी निवडलेल्या सगळ्या स्थळांमधून या व्हिस्परिंग व्हॅलेज रिसॉर्टची निवड केली. ती जागा भूतांनी झपाटलेली असल्याचे पूर्वी म्हटले जात असे. त्यामुळे या मालिकेच्या टीममधील अनेकजण जागेच्या गूढतेमुळे घाबरले होते. बंद खोल्यांमध्ये कुजबुज ऐकल्याचे, थंड वार्याच्या झोताचे तसेच रात्री वस्तू गायब होण्याचे विचित्र अनुभव देखील त्यांना येत होते. चित्रीकरण सुरू असताना असा काही अनुभव आला तर काय करायचे असा प्रश्न या मालिकेच्या टीमला पडला होता. पण रिसॉर्टमध्ये चित्रीकरणाच्या दरम्यान काहीही अघटित घडले नाही त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. एक दीवाना था या मालिकेच्या पुढील भागांमध्ये शरण्या आणि व्योम त्यांच्या विवाहित आयुष्याला सुरुवात करणार आहेत. पण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्यातून ते कसे मार्ग काढतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : एक दीवाना था फेम डॉनल बिष्ट पडली या गोष्टीच्या प्रेमात