'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. यातील कलाकारांचा अभिनय कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शिनी, शिवाली, ईशा डे, वनिता खरात, गौरव मोरे सह अनेक कलाकारांनी सर्वांना खळखळून हसवलं. तर दुसरीकडे कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीलाही (Prajakta Mali) विशेष प्रसिद्धी मिळाली. तिचा 'वाह दादा वाह' डायलॉग गाजला. तसंच तिचं हसणंही खूप व्हायरल झालं. मात्र गेल्या काही एपिसोड्समध्ये प्राजक्ता दिसली नाही. त्यामुळे तिने शो सोडला का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा काही महिन्यांपासून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परदेश दौऱ्यासाठी घेतलेल्या ब्रेकनंतर टीम परतली आहे. मात्र गेल्या काही एपिसोडमध्ये प्राजक्ता माळी नाही तर प्रियदर्शिनी इंदलकर शोचं सूत्रसंचालन करताना दिसली. तर प्राजक्ता केदारनाथ, बद्रिनाथचं दर्शन करायला गेल्याचं तिच्या सोशल मीडियावरुन पाहायला मिळालं. यामुळे प्राजक्ताने हास्यजत्रा सोडली का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. सोशल मीडियावर हीच चर्चा सुरु झाली आहे.
याआधीही प्राजक्ता काही एपिसोडमध्ये दिसायची नाही. पण यावेळी ती महिनाभर सूत्रसंचालन करण्यासाठी आलेली नाही. तिने एवढा मोठा ब्रेक कधीही घेतला नव्हता. हास्यजत्रेत तिला पाहण्यासाठी सर्वच आतुर असतात. प्राजक्तानेही अनेकदा या शो प्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा कधी परत येतेय किंवा तिने खरंच शो सोडला आहे का यावर अजून तिच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.