बिग बॉस हिंदीच्या १९ व्या पर्वात मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे सहभागी झाला आहे. सोशल मीडियावर सर्वच मराठी प्रेक्षक प्रणितला पाठिंबा देत आहे. प्रणितनेही त्याच्या विनोदी शैलीतून सर्वांचं मन जिंकून घेतलं. सलमान खानने त्याला पहिल्या दोन आठवड्यात सुनावलं होतं. मात्र नंतर त्याचं कौतुकही केलं. सध्या प्रणितला घरातील काही सदस्यांनी लक्ष्य केलं आहे. अमाल मलिकने त्याची खिल्ली उडवली, त्याला हातही लावला. यावरुन आता धनंजय पोवारने संताप व्यक्त केला आहे.
धनंजय पोवार व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "बघितला ना व्हिडिओ? हे असं मराठी माणसाबरोबर केलं जातं. म्हणजे सतत तुच्छ लेखलं जातं. सतत कमी लेखलं जातं. जे काय करायचं, जो काही इतिहास घडवायचा तो अख्ख्या महाराष्ट्राने घडवायचा. महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून त्यांनी घडवलाय. आणि हे तुम्ही हिंदी लोक ट्रोल करताय, चेष्टा मस्करी करताय, नाही त्या हरकती करताय त्या सगळ्या गोष्टींमुळे आमची मनं दुखावतात हे लक्षात ठेवा. "
तो पुढे म्हणाला, "ट्रोल करताय ना, त्याच्याबरोबर किडे करताय ना ते अख्खा महाराष्ट्र बघतोय लक्षात ठेवा. आज सोशल मीडिया सगळ्यात जास्त वापरणारा वर्ग महाराष्ट्रात आहे. आज हा मराठी माणूस जोक नाही. प्रणित तू फक्त लढ. ११ कोटी लोक एक मराठी म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू चांगलं खेळतोय खेळत राहा."
अनेक लोकांनी कमेंट करत प्रणितला पाठिंबा दिला आहे. तसंच अमाल मलिक आता डर्टी गेम खेळत आहे अशीही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच धनंजय पोवारच्या या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी सहमती दर्शवली आहे.