Join us

​दिया और बाती हम मालिकेची अभिनेत्री संध्या सिंगने निर्मात्यांविरोधी केली केस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 11:18 IST

दिया और बाती हम ही मालिका संपून जवळजवळ चार ते पाच महिने झाले आहेत. पण आता या मालिकेचे निर्माते ...

दिया और बाती हम ही मालिका संपून जवळजवळ चार ते पाच महिने झाले आहेत. पण आता या मालिकेचे निर्माते आणि या मालिकेची नायिका दीपिका सिंग यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी आता दीपिकाला 16 लाखांचा दंड भरण्यासाठी डेबिट नोट पाठवली आहे. याविरोधात दीपिकाने सिंटा (सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन) कडे तक्रार नोंदवली आहे. कोणताही दंड भरण्यासाठी दीपिका तयार नाहीये. याउलट मालिकेच्या निर्मात्यांकडूनच तिचे 1 करोड 14 लाख रुपये येण्याचे बाकी असल्याचे तिचे म्हणणे आहे. दीपिका चित्रीकरणाला अनेक वेळा उशिरा जायची. त्यामुळे निर्मात्यांचे खूप नुकसान व्हायचे असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. दीपिकाने 16 लाख देऊन ही नुकसानभरपाई करावी असे त्यांनी दीपिकाला पाठवलेल्या कायदेशीर तक्रारीत म्हटले आहे. आजकाल मालिका संपल्यानंतर अनेक कलाकारांना त्यांची शिल्लक राहिलेली रक्कम देण्याऐवजी त्यांना निर्मात्यांकडून डेबिट नोट पाठवली जाते. कलाकार सेटवर उशिरा आल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी निर्मात्यांनी हा मार्ग अवलंबवला आहे. पण शशी-सुमीत प्रोडक्शनसारख्या नामांकित प्रोडक्शन हाऊसनेदेखील अशाप्रकारे पाऊल उचलल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. शशी सुमन प्रोडक्शन हाऊसने दिपिकाच्या उशिरा येण्याबद्दल सिंटाकडे कधीच तक्रार केली नव्हती. खरे तर कलाकारांच्या अनप्रोफेशनल वागण्याबद्दल सिंटाला कळवणे आवश्यक असते. पण काहीही तक्रार न करता आता तिला थेट 16 लाखांचा दंड भरण्यासाठी डेबिट नोट पाठवण्यात आली आहे. दीपिकाच्या या तक्रारीबाबत सिंटाचे सचिव अभिनेता अमित बेहल सांगतात, "दीपिकाची तक्रार इंडियन फिल्म अँड टिव्ही प्रोड्युसरर्स काऊन्सिलकडे सोपावण्यात आली आहे. सिंटा, फिल्म अँड टिव्ही प्रोड्युसरर्स काऊन्सिल, दीपिका आणि शशी-सुमीत यांना यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच त्यांना एकत्र बोलावण्यात येईल.     दीपिकाने दिया और बाती हम या मालिकेत संध्या ही प्रमुख भूमिका साकारली होती. जवळजवळ पाच वर्षं या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.