झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'देवमाणूस' (Devmanus Serial). या मालिकेच्या दोन भागांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच भेटीला येतो आहे. देवमाणूस मधला अध्यायचा प्रोमो अलिकडेच रिलीज करण्यात आला आहे आणि देवमाणूसच्या या सीझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
देवमाणूस मधला अध्याय मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) दिसणार आहे. त्याच बरोबर आधीच्या दोन सीझन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांचं मन जिंकलेली सरू आजी म्हणजे रुक्मिणी सुतार(Rukmini Sutar)सुद्धा असणार आहेत. त्याचसोबत अजून एक सरप्राईझ म्हणजे या मालिकेतून अण्णा नाईक म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. त्यामुळे किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
देवमाणूस मधला अध्याय या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीझनच्या मधली आहे. डॉक्टर अजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्यामध्ये तो कुठे होता? काय करत होता? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवलं, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळं आपल्याला देवमाणूस मधला अध्याय या मालिकेत बघायला मिळणार आहे. देवमाणूस - मधला अध्याय २ जूनपासून दररोज रात्री १० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.