Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा! कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 15:34 IST

सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा, असा इशारा ग्रामस्थ व पुजा-यांनी दिला आहे.

ठळक मुद्देया मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे.

दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका तूर्तास वादात सापडली आहे. जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत ही मालिका त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. जोतिबा मंदिरापुढे निदर्शने करत, जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ व पुजा-यांनी जोतिबाचे सरपंच राधा बुणे यांच्याकडे निवेदन सोपवले. या निवेदनात मालिकेत दाखवल्या जात असलेल्या चुकीच्या गोष्टींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यावर सुरुवातीला ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. जोतिबाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला कळेल, जोतिबाची महती घरोघरी पोहोचेल, याबद्दल सगळेच आनंदात होते. प्रत्यक्षात मालिका सुरु झाल्यानंतर मात्र ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाली. मालिकेत अनेक चुकीच्या घटना असल्याचा आरोप गुरव समाजातील पुजा-यांनी केला आहे. हा प्रकार जोतिबा भक्तांच्या भावना दुखावणारा असल्याचा आरोपही पुजा-यांनी केला आहे.

या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू असून त्यासाठी चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभा केला आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले. विशाल हा स्वत: जिम ट्रेनर असून नुकताच अभिनयाकडे वळला आहे. विशालने याआधी ‘साता जन्माच्या गाठी’या मालिकेत तर  मिथुन्  आणि  धुमस  या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या.

टॅग्स :महेश कोठारे