वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ छोट्या पडद्यावर पुन्हा परततेय,नव्या सीझनमध्ये लहान रतन झाला मोठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 10:27 IST
छोट्या पडद्यावरील पहरेदार पिया की ही मालिका पहिल्याच भागापासून वादात सापडली होती. पहिलाच भाग प्रसारित झाल्यापासून वादाचं ग्रहण लागलेल्या ...
वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ छोट्या पडद्यावर पुन्हा परततेय,नव्या सीझनमध्ये लहान रतन झाला मोठा
छोट्या पडद्यावरील पहरेदार पिया की ही मालिका पहिल्याच भागापासून वादात सापडली होती. पहिलाच भाग प्रसारित झाल्यापासून वादाचं ग्रहण लागलेल्या या मालिकेला अवघ्या काही दिवसांतच छोट्या पडद्यावरुन गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र आता मालिकेच्या निर्मात्यांनी पहरेदार पिया की या मालिकेचा नवा सीझन घेऊन येण्याचं ठरवलं आहे. पहिला सीझन अचानक संपवल्यानं निराशा झालेल्या रसिकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. ही मालिका आधी ज्या वाहिनीवरुन प्रसारीत केली जात होती त्याच वाहिनीवरुन आधीच्या वेळेलाच प्रसारीत होणार आहे असं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नव्या सीझनमध्येही कायम राहणार आहे. तेजस्वीशिवाय आणखी काही नवे कलाकार या मालिकेच्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळतील. तेजस्वीने या मालिकेच्या शूटिंगलाही सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. या नव्या सीझनचा प्रोमोही तेजस्वीने शूट केला आहे. या मालिकेतील कलाकार तेच राहणार असले तरी तरी काही नव्या कलाकारांसह नवं कथानक घेऊन ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. नव्या सीझनमध्ये तेजस्वीच्या नायकाची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचं नावही समोर आलं आहे. अभिनेता रोहित सुचांती पहरेदार पिया की मालिकेच्या नव्या सीझनमध्ये झळकणार आहे. छोट्या पडद्यावर गाजलेल्या साथ निभाना साथियाँ मालिकेत रोहितनं रिकी ही भूमिका साकारली होती. आता पहरेदार पिया की या मालिकेच्या नव्या सीझनमध्ये तो वयाने मोठ्या झालेल्या रतन सिंगची भूमिका साकारणार आहे. रोहित साकारणार असलेली ही भूमिका साकारण्यासाठी याआधी शंतनू महेश्वरी याचं नाव अंतिम झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता शंतनूचं नाव मागे पडलं असून रोहितने त्यात बाजी मारली आहे. पहरेदार पिया की-2 मधील तरुण रतन सिंग या भूमिकेला रोहितच न्याय देऊ शकतो असं निर्मात्यांना वाटतं आहे. कारण रोहितचा लूक एखाद्या परदेशातून परतलेल्या मुलाप्रमाणे असून त्याचं व्यक्तीमत्त्व राजबिंड्या स्वरुपाचं असल्याचं निर्मात्यांना पटलं. तेजस्वी आणि रतन दोघांचाही मालिकेत राजेशाही थाट असणार आहे. त्यासाठी तेजस्वी आणि रोहित परफेक्ट आहेत याची खात्री निर्मात्यांना पटली आहे. नव्या सीझनमध्ये रतन सिंग परदेशातून आपलं शिक्षण पूर्ण करुन येणार आहे. तिथूनच मालिकेचं कथानक पुढे जाईल. या मालिकेत तेजस्वी राजेशाही अवतारात दिसेल तर रतन सिंग म्हणजेच रोहितचा मॉर्डन अंदाज पाहायला मिळेल. Also Read:तेजस्वी वायंगणकर तैवानमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन,'पहरेदार पिया की' मालिकेमुळे आली होती चर्चेत