Join us

‘पहरेदार पिया की’ ही वादग्रस्त मालिका पुन्हा सुरू होणार, निर्मात्यांनी केला खुलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 19:47 IST

काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका बंद ...

काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका बंद केली जाणार आहे. एवढेच काय तर मालिकेची शूटिंगही अर्ध्यातच थांबविण्यात आली असून, गेल्या सोमवारी म्हणजेच २८ आॅगस्ट रोजी ही मालिका प्रसारितदेखील करण्यात आली नाही. मात्र आता या मालिकेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला असून, मालिका नव्या कथेसह पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. बॉलिवूडलाइफ या वेबसाइटशी बोलताना मालिकेचे निर्माता सुमीत मित्तल यांनी सांगितले की, ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अजून बंद झालेली नाही. चॅनल आणि प्रॉडक्शनला याविषयी माहिती होते. या दोघांच्याच सहमतीने काही दिवस मालिका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मालिकेच्या कथेवर विचार केला जात असून, लवकरच नव्या कथेसह मालिका परतणार आहे, असेही मित्तल यांनी स्पष्ट केले. अचानक मालिका बंद केल्याने शोमधील स्टार्स निराश झाले होते. त्यामुळेच निर्मात्यांनी नव्या कथेसह मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक पेटीशन साइन करण्यात आले होते, ज्यावर लाखो लोकांनी ही मालिका बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण बीसीसीसीपर्यंत पोहोचले. बीसीसीसीने सोनी चॅनलला मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्मात्यांनी ८.३० या प्राइम टाइमऐवजी १०.३० वाजता मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. सुमित मित्तल यांनी म्हटले की, ‘जेव्हा मालिकेची वेळ बदलण्यात आली तेव्हापासूनच आम्ही कथेतील कंटेंटवर विचार करायला सुरुवात केली. जर कथेत योग्य तो बदल केला तर ही मालिका पुन्हा एकदा प्राइम टाइमवर प्रदर्शित केली जाऊ शकते.’ दरम्यान, मालिकेला होत असलेला विरोध पाहता निर्मात्यांना नव्या दमाने मालिका प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणे म्हणावे तेवढे सोपे नसेल. कारण निर्मात्यांनी पुन्हा शोमध्ये याच कथेची पुनरावृत्ती केल्यास पुन्हा एकदा विरोधाचा सूर समोर येऊ शकतो.