Join us

​चिन्मय मांडलेकर जाणार पंढरपूरच्या वारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 13:43 IST

तू माझा सांगाती या मालिकेत सध्या चिन्मय मांडलेकर संत तुकारामांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना ...

तू माझा सांगाती या मालिकेत सध्या चिन्मय मांडलेकर संत तुकारामांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अनेक ठिकाणी तर लोक त्याला संत तुकाराम समजून पाया पडताना देखील दिसून येत आहेत. संत तुकारामांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी चिन्मयला स्वीकारले आहे. चिन्मयने आजवर साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील भूमिका खूपच वेगळी होती. पण त्याने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सध्या पंढरपूरची यात्रा सुरू असून सगळे वातावरण हे विठ्ठलमय झाले आहे. पंढरपूरच्या यात्रेला जायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. पण प्रत्येकाला त्याच्या कामकाजातून वेळ काढून जाणे शक्य होत नाही. चिन्मय मांडलेकर हा एक केवळ उत्कृष्ट अभिनेता नाहीये तर तो एक चांगला लेखक देखील आहे. तसेच त्याने निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. एक दिग्दर्शक म्हणून देखील त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिन्मय एकाच वेळी अशा वेगवेगळ्या अनेक भूमिका साकारत असल्याने तो त्याच्या कामात नेहमीच व्यग्र असतो. पण त्याने त्याच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून एक पूर्ण दिवस एका चांगल्या गोष्टीसाठी द्यायचे ठरवले आहे. तो लवकरच पंढरपूरच्या वारीला जाणार आहे. वारीला जाण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. त्याने याआधी देखील पंढरपूरच्या वारीला हजेरी लावली आहे. चिन्मय एक वारकरी म्हणून वारकऱ्यांच्या वेशातच पंढरपूरच्या वारीला जाणार आहे. तू माझा सांगाती ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत संत तुकारामांचे आयुष्य खूपच चांगल्याप्रकारे दाखवले जात आहे.