Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता...'फेम पोपटलाल 'या' मराठी अभिनेत्याचा बॅचमेट; म्हणाला, "कॉलेजमधल्या सर्वात सुंदर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:38 IST

मालिकेत अविवाहित पण खऱ्या आयुष्यात कॉलेजमधल्या मुलीशीच केला प्रेमविवाह, मराठी अभिनेत्याने सांगितला पोपटलालचा किस्सा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील सर्वांच्या आवडीचं पात्र म्हणजे पोपटलाल. हातात छत्री, जोक्यावरल टोपी, चष्मा, खांद्यावर झोळी असा त्याचा पत्रकार पोपटलालच्या भूमिकेतला लूक असतो. 'दुनिया हिला दुँगा' हा त्याचा डायलॉग तर खूप गाजला आहे. मालिकेत पोपटलालचं लग्नच होत नसतं. मुली बघताना दरवेळी काही ना काही अडचणी येतात आणि त्याचं लग्न रखडतंच. अभिनेता श्याम पाठकने मालिकेत ही भूमिका साकारली आहे. दरम्यान श्याम पाठक एनएसडीचा विद्यार्थी असून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा तो बॅचमेट आहे. 

अभिनेता श्याम पाठकने एनएसडीतील बॅचमेट रेशमीसोबत २००३ साली लग्न केलं. त्यांना तीन मुलंही आहेत. मोठी मुलगी नियती, मुलगा पार्थ आणि शिवम हा सर्वात छोटा मुलगा आहे. 

मराठीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर एनएसडीचा विद्यार्थी आहे. तेव्हा कॉलेजमध्ये त्याचे अनेक बॅचमेट्स होते. त्यांच्याबद्दल नुकतंच त्याने एका मुलाखतीत सांगितलं. त्यातच पोपटलालचाही उल्लेख आला. अमोल परचुरेंच्या 'कॅचअप'ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय म्हणाला, "मी एनएसडीमध्ये २००३ साली पास आऊट झालोॉ . तेव्हा माझे बरेच बॅचमेट होते जे आज प्रसिद्ध कलाकार आहेत. हर्षद मेहताच्या स्कॅममध्ये प्रतीक गांधीच्या भावाच्या भूमिकेत दिसलेला हेमंत खेर माझा बॅचमेट होता. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'मध्ये दिसलेला इराकी जनरल जो अक्षयला नडतो तो इनामूल हक तोही माझा बॅचमेट. त्यानंतर 'दंगल'मध्ये दाखवलेला अंडीवाला बद्रुल इस्लामही माझा क्लासमेट होता. आमचा अत्यंत महत्वाचा बॅचमेट म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा मधला पोपटलाल...श्याम पाठक. मालिकेत त्याचं लग्नच होत नाही असं दाखवलं आहे पण आमच्या कॉलेजमधल्या सर्वात सुंदर मुलीला पटवून त्याने लग्न केलं. आमच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी अनुपम खेर हे एनएसडीचे चेअरमन होते. त्यांनी आमचे क्लासेसही घेतले होते. "

पंकज त्रिपाठी माझा ज्युनिअर

"पंकज त्रिपाठी माझ्यापेक्षा वयाने मोठा असला तरी एनएसडीमध्ये तो माझा ज्युनिअर होता. मी दुसऱ्या वर्षाला असताना पंकज पहिल्या वर्षात होता. आज तो सर्वात मोठा कलाकार आहे. कॉलेजमध्ये आम्ही ज्युनिअरचं रॅगिंग केलं त्यात पंकजचंही केलं होतं. पण आम्हाला तेव्हाच कळलं होतं की हा अवलिया आहे. कारण तो अनुभवाने मोठाच होता. दिल्ली थिएटरमध्ये त्याला आम्ही पाहिलं होतं. तो उत्तम गायकही होता."

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमराठी अभिनेताटेलिव्हिजनतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा