Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बालपण देगा देवामध्ये अंधश्रद्धेविरोधात आनंदीचे पहिले पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 11:49 IST

‘बालपण देगा देवा’ मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरू झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले साकारत ...

‘बालपण देगा देवा’ मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरू झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले साकारत असून त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे तर आनंदीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मैथिलीने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आनंदीचे निरागस प्रश्न, तिची हुशारी मालिकेतील अनेक प्रश्न सोडवेल आणि प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल यात काहीच शंका नाही. बऱ्याच वर्षांपासून बळी देण्याची प्रथा आपल्या समाजात आहे. ही प्रथा खरे तर अत्यंत अमानुष आहे. पण एखाद्या प्राण्याचा, पक्षाचा बळी दिला की, अमुक गोष्ट होते असा अनेकांचा समज असतो. बऱ्याच लोकांनी या प्रथेविरोधात आवाज देखील उठवला आहे. पण अजूनही ही प्रथा आपल्या समाजात अस्तित्वात आहे. याच प्रथेविरोधात ‘बालपण देगा देवा’मधील चिमुकली आनंदी आवाज उठवणार आहे.श्रद्धा जर डोळस असेल तर माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. पण अंधश्रद्धा माणसाचा घात देखील करू शकते. त्यामुळे तिला वेळीच मिटवणे गरजचे असते. पाण्याची समस्या, पाऊस कमी पडणे या समस्या महाराष्ट्रातील माणसाला माहिती नाही असे नाही. त्यामुळे गावामध्ये पाऊस पडवा, पाण्याची टंचाई भासू नये अशी प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा असते. आनंदीच्या गावामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांनादेखील पाऊस खूप पडावा असे वाटत आहे. कारण गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. पाऊस खूपच कमी पडतो आहे. त्यामुळे गावामध्येच राहणाऱ्या बिर्जे नावाच्या माणसाने यावर्षी पाऊस चांगला पडला तर मी कोकरुचा बळी देईन असा नवस म्हटला आहे. पण पाऊस पडावा म्हणून बिर्जे कोकरूचा बळी देणार आहे, ही गोष्ट संपूर्ण गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. अण्णाच्या कानावर देखील ही बाब आली आहे, त्यांना या गोष्टीचा खूप राग देखील आला आहे. गावामधलाच एक मुलगा जो आनंदीचा देखील मित्र आहे तो तिला देखील ही गोष्ट सांगतो. आनंदीला ही गोष्ट चुकीची वाटते आणि सोनूच्या मदतीने ती त्या निष्पाप कोकरूचा जीव वाचवते. आनंदी आणि अण्णा बिर्जेला समजवून सांगतात की, एका निष्पाप जीवाचा बळी देऊन हे सगळे साध्य होईल असे तुला वाटते का? तर हे चुकीचे आहे. हे सगळे ऐकून बिर्जेला देखील त्याची चूक कळते, एका जीवाचा बळी देणे हे चुकीचे आहे हे त्याला पटते. ‘बालपण देगा देवा’ या मालिकेमधून समाजाला एक महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, मुक्या प्राण्याचा जीव घेऊन काहीच साध्य होत नसते.