ठिपक्यांची रांगोळी मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील शशांक आणि अप्पू ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध होणार आहे. तो रुजुता धारप(Rujuta Dharap)सोबत लवकरच लग्न करणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप आज लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री रुजुता धारपचा नुकताच साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, १९.१२.२०२२ नवीन सुरूवात. साखरपुडा. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर कलाकार मंडळीदेखील शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अभिनेता चेतन मूळचा नाशिकचा असून तिथेच त्याने शालेय तसेच पदवीचे शिक्षण घेतले. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील लेक माझी लाडकी या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. झी मराठीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत देखील चेतन मुख्य भूमिका साकारताना दिसला होता.
झी युवा वरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला. याच मालिकेत काम करत असताना अभिनेत्री ऋजुता धारप सोबत त्याची छान मैत्री झाली. फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता एकत्र आले आणि त्यांच्यात प्रेम फुलले. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. ऋजुता धारप ही देखील एक गुणी अभिनेत्री आहे. आई माझी काळूबाई, वर्तुळ, क्राईम पॅशन, घरात मॅरीड बाहेर बॅचलर अशा मालिका आणि नाटकांमधून ऋजुता धारप प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.