शेफ विकास खन्नाला वाटतेय उंचीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:12 IST
आकर्षक खानसामा म्हणून तो ओळखला जातो. तो आपल्या स्वयंपाकघरात जे पदार्थ बनवितो, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होते. अनेकांना त्याच्याप्रमाणे ...
शेफ विकास खन्नाला वाटतेय उंचीची भीती
आकर्षक खानसामा म्हणून तो ओळखला जातो. तो आपल्या स्वयंपाकघरात जे पदार्थ बनवितो, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होते. अनेकांना त्याच्याप्रमाणे विविध डिश बनविण्याची इच्छाही होते. अशा शेफ विकास खन्नाला मात्र सध्या एका भीतीने ग्रासले आहे. होय, विकासला उंचीची भीती वाटत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. शेफ कुणाल कपूर आणि रेस्तरॉँचा मालक झोरावर कालरा यांच्याबरोबरीने शेफ विकास खन्ना सध्या ‘मास्टरशेफ इंडिया’च्या पाचव्या सीजनमध्ये परीक्षकाचे काम करीत आहे. अर्थात यात स्पर्धकांना सल्ले देणे हा महत्त्वाचा भाग त्याच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे जिथे टीम तिथे विकास हे सूत्र निर्माण झाले आहे. शोच्या या टीमने अलीकडेच ‘इमॅजिका’ या मनोरंजन पार्कमध्ये चित्रीकरण केले, तेव्हा शेफ विकासला उंचीची भीती वाटत असल्याचे उघड झाले. त्याचे झाले असे की, विकास आणि इतर सर्व ‘मास्टरशेफ इंडिया’च्या एका विशेष भागासाठी मुंबईजवळील ‘इमॅजिका’ या मनोरंजन पार्कमध्ये चित्रीकरण करीत होते. मात्र इतर स्पर्धकांनी त्याला जायंट व्हीलमध्ये बसण्याची विनंती केली. पण विकास काही त्यात बसायला तयार होईना. शेवटी बराच वेळ आग्रह करून झाल्यावर त्याने आपल्याला उंचीची भीती वाटत असल्याचे उघडपणे सांगितले. त्याची ही भीती सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारी असली तरी, इतरांनी ही बाब समजून घेतली. आपल्या आवडत्या शेफ आणि परीक्षकासाठी स्पर्धकांनी लगेचच एक कमी उंचीची छोटी राइड शोधली. अर्थात यासाठी सगळ्यांचीच धावपळ झाली. स्पर्धकांच्या या प्रयत्नांमुळे शेख विकास खन्ना भारावून गेला आणि त्याने कार्यक्रमाच्या ब्रेकमध्ये या राइडचा आनंद लुटला.