'चला हवा येऊ द्या'वरुननिलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतल्यानंतर शरद उपाध्येंनी पोस्ट करत त्याच्यावर आरोप केले होते. यामध्ये त्यांनी निलेश साबळेचा उल्लेख अहंकारी आणि गर्विष्ट असा करत डोक्यात हवा गेल्याचं म्हटलं होतं. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावर निलेश साबळेने प्रत्युत्तरही दिलं. शरद उपाध्येंच्या पोस्टनंतर 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकाराने पोस्ट लिहित त्याचं मत मांडलं आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या काही एपिसोडमध्ये अभिनेता अभिषेक बारहाते-पाटील दिसला होता. त्याची किम जोंग उन ही भूमिका प्रेक्षकांनाही आवडली. आता शरद उपाध्ये-निलेश साबळेच्या वादात अभिषेकने उडी घेतली आहे. त्याने निलेश साबळेची बाजू घेतली आहे.
अभिनेत्याने पोस्टमध्ये काय म्हटलं?
प्रति, सन्मा.शरद उपाध्ये साहेब
आज तुमची एक पोस्ट वाचली.डॉक्टर निलेश साबळे यांच्याबद्दलची... ते डॉक्टर ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या गावातल्या मुलांची स्वप्नं साकार झाली. त्या माणसाबद्दल वाईट, अपमानास्पद बोललं गेलं.
"डोक्यात हवा गेलीय","याला आपणच मोठं केलं...""सगळा अभिनय फक्त स्वतःची शोभा वाढवायला..."असं किती काही वाचायला मिळालं आणि खरं सांगायचं, तर राग आला. पण त्याहून जास्त खंत वाटली. कारण तुम्ही टीका केली त्या माणसावर, ज्यांनी लोकांमध्ये चेहरा नसलेल्या, आवाज नसलेल्या, नाव नसलेल्या मुलांना नाव दिलं, आवाज दिला, आणि स्टेज दिला.
हो, मी गावाकडचा आहे.शुद्ध भाषेचा अभाव, बोलण्याची भीती होती. अभिनय माहीत नसलेला पण तेव्हा कोणीतरी होता ज्याने आमच्यासारख्या गावठीवर विश्वास ठेवला. आम्ही काहीतरी करू शकतो, हे पहिल्यांदा दाखवून दिलं.
डॉक्टर निलेश साबळे आमचे मार्गदर्शक,आमची ओळख.
ज्या शोबद्दल आपण बोलला 'चला हवा येऊ द्या' विषयी...शून्य जाहिरातीतून, शून्य गॉसिपमध्ये राहून...फक्त कामावर विश्वास ठेवत तो शो अविरत पणे चालवला तो साबळे सरांनी आणि बघता बघता तो कार्यक्रम १० वर्ष टिकला. लोक मराठी शो बदलून पाहायचे, हिंदी कलाकार मराठीत यायला भाग पडले. पहिला मराठी शो ज्याने हिंदी कलाकार मराठी स्टेजवर आणले आणि एक दिवस असा आला की ‘चला हवा येऊ द्या शो’फक्त मुंबईपुरती मर्यादित गोष्ट राहिली नाही.
कोणी तरी म्हणालं – “स्टारडम डोक्यात गेलंय.” हो, गेलंय कदाचित पण ते डोक्यात गेलेलं ‘हवा’ नाही ...तर अनुभव, संघर्ष, आणि हजारोंच्या पाठीशी उभं राहिलेलं आत्मभान आहे. आमच्यासारख्या पोरांना लोक विचारायचे "तू कुठून आलास?" आज विचारतात "तू त्या शोमध्ये होता ना?" ही ओळख फुकट मिळत नाही. ही ओळख मिळवून द्यायला कोणीतरी आयुष्य घालवतं लागतं आणि म्हणूनच कोणीही काहीही बोलेल, तरी सत्य बदलत नाही. ज्यांनी निर्माण केलं, त्यांचं योगदान काही पोस्टने मिटत नाही.
हे सरांचं कौतुक नाही, हे आम्हा सर्वांचं उत्तर आहे. कारण जिथे आमचा आवाज थांबतो, तिथे त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं. आणि आज कोणी त्यांच्यावर बोट दाखवत असेल, तर आम्ही शंभर आवाजांनी त्यांचं नाव पुन्हा पुन्हा उच्चारू. आमचं शिक्षण, आमचा आत्मविश्वास, आमची ओळख...किती मोलाचं असतं हे तुम्हाला समजणार नाही. कारण तुमचं सगळं काही तयार होतं. आमचं तर त्यांच्यामुळे सुरू झालं.
तुम्ही टीका करत राहा, आम्ही आदर करत राहू. कारण तुम्ही नाव घेतलं, आणि आम्ही नाव कमावलं...त्यांच्या बरोबर उभं राहून. एक गावातला मुलगा (जो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलाय-एका माणसामुळे)
दरम्यान, निलेश साबळे एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाचं शूटिंग अजून काही महिने असल्यामुळे त्याने 'चला हवा येऊ द्या'मधून माघार घेतली आहे. तर या सिनेमात निलेशसोबत भाऊ कदमही असणार आहे. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात भाऊ कदमही दिसणार नाही.