टेलिव्हिजन आणि चित्रपटांच्या ग्लॅमरस जगात खूप प्रसिद्धी आणि पैसा आहे. असे म्हटले जाते की एकदा कोणी या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं की त्यातून माघार घेणे कठीण असते. पण महाराष्ट्रातील रहिवासी अभय डागा(Abhay Daga)ने 'सिया के राम' या मालिकेतून ग्लॅमरस जगात पदार्पण केले. पण आता त्याने अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. आता तो आयपीएस अधिकारी झाला असून त्यासाठी त्याने अभिनयातून कायमचा संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अभय डागाने सिया के राम या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. अभय आयआयटीमधून उत्तीर्ण झाला आहे आणि त्याने एका चांगल्या कंपनीतही काम केले आहे. तो आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना त्याच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. २०१८ मध्ये त्याने स्टार प्लसवरील लोकप्रिय शो सिया के राममध्ये शत्रुघ्नची भूमिका साकारली. त्यानंतर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले.
लाखोंच्या पॅकेजवाल्या नोकरी दिला राजीनामाअभय इथेच थांबला नाही, त्याने पुन्हा जोखीम घेण्याचे ठरवले. २०२१ मध्ये अभयने लाखोंच्या पॅकेजसह मायक्रोसॉफ्टच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि UPSC ची पूर्णवेळ तयारी सुरू केली. अभयच्या मेहनतीला फळ मिळाले आणि २०२३ मध्ये तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला. अभयला UPSC मेन्समध्ये ७९९ गुण आणि मुलाखतीत १७९ गुण मिळाले. UPSC CSE २०२३ मध्ये अभयला १८५ वा रँक मिळाला. रिपोर्ट्सनुसार, अभयचे गृहराज्य महाराष्ट्र आहे, तर त्याला यूपी कॅडर मिळाले आहे. अभयने हे सिद्ध केले की जर एखाद्या व्यक्तीची कोणती इच्छा असेल तर तो कठोर परिश्रमाच्या जोरावर काहीही साध्य करू शकतो.