Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्ष शिंदेचा मोठेपणा! आजींकडून खरेदी केले मासे; म्हणतो- २ हार्टअटॅक, अपघातामुळे पायात रॉड असूनही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:54 IST

उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो मासे विकत घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने पोस्टही लिहली आहे. 

गायक उत्कर्ष शिंदे हा 'बिग बॉस मराठी' या शोमधून घराघरात पोहोचला. या शोमधून शिंदेंच्या लेकाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पेशाने डॉक्टर असलेला उत्कर्ष उत्तम गायक आहे. त्याबरोबरच तो अभिनेतादेखील आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. सध्या उत्कर्षने केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. 

उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो मासे विकत घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने पोस्टही लिहली आहे. 

"हातावर मिळवायचा पानावर खायचा” 

शूटिंग संपवून मुरुडला गेलो.समुद्र,हिरवीगार झाडी,पद्मदुर्ग किल्ला, पाण्यात डोलणाऱ्या होड्या, पाटीलवाडा खानावळ,आणि मच्छीमार बांधव= स्वर्ग. मासे खाण्याचा मोह आवरेना मग काय मुरुड-जंजिरा मच्छी मार्किटमध्ये गेलो. म्हटलं जाळ्यात अडकलेले ताजे मासे पाहू. पण, काय तिकडे एका मच्छी विकणाऱ्या आईला भेटलो आणि त्यांच्या प्रेमाच्या आपुलकीच्या गोडमखमली जाळ्यात मीच स्वतःला हरवून बसलो.सकाळ सकाळी मच्छी मार्किट मधे मासे विकणाऱ्या वासंती मावशीची भेट झाली.

थोडे सुकट,बोंबिल,करडी,सोडे,घेऊ म्हटलं. मावशीसोबत गप्पा रंगल्या बोलता बोलता आज थोडा ताप आहे बाळा म्हणत व्यथा सांगता सांगता मावशीच्या डोळ्यात पाणी दिसलं. मी मावशी जवळ जाऊन बसलो पूर्ण व्यथा ऐकली. त्यांना येऊन गेलेले २ हार्टअटॅक, ॲक्सिडेंटमुळे पायात आलेले रॉड,घरची परिस्थिती नाजुक तरीही न हरणारी ती माऊली मन जिंकून गेली. उन्हं वाढलं तरी बसावतर लागणारच ना बाळा आजचा म्हावरा विकला की घरी जाऊन आराम करता येईल म्हणाली. 

“हातावर मिळवायचा पानावर खायचा”.हे शब्द त्या मावशीचे, जे शब्द मनाला चटका लावून गेले.थोडा फार म्हावरा घ्यायला गेलेलो मी त्यांच्याकडे असलेलं आखा माल त्यांच्या सर्व पाट्याच रिकाम्या करुन आलो.का घेतला माहीत नाही. पण, गोन्या भरुन म्हावरा आणला आणि वासंती मावशीला तुम्ही घरी जा औषध घेऊन आराम करा म्हटलं.मला ताजा म्हावरा तर मिळालाच पण त्यापेक्षा मोठा त्या मावशी कडून आशीर्वाद मिळाला.तुला माझ्या बल्लाळेश्वराने पाठवला आहे. बाळा म्हणत ती मावशी आनंदली. काही वेळेला आपण आपल्या कृतीतून आपण बरंच काही मिळवतो.जन्म एकदाच आहे हसत मिळून मिसळून जगा. तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलू द्या.वासंती मावशीचा मुरुडचा त्या निरागसतेचा निरोप घेतला.सोबत आला वासंती मावशीचा आशीर्वाद आणि म्हावरा. 

उत्कर्षची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या कृतीचं कौतुक केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेला उत्कर्ष लवकरच मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी