'बिग बॉस मराठी'मुळे छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे प्रसिद्धीझोतात आला होता. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या ट्रोलिंगला छोटा पुढारी कंटाळला आहे. त्याने पोलिसांत तक्रार नोंदवत हे थांबलं नाही किंवा कारवाई झाली नाही तर आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी छोटा पुढारीने श्रीगोंदा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
छोटा पुढारी म्हणतो, "नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे. मी जे काही आहे तुमच्या आशीर्वादामुळेच आहे. पण, मित्रांनो, काय होतंय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीचे लोक आणि विरोधक ज्यांचं मला नाव गाव काहीच माहीत नाही. ते माझ्या मागे का लागलेत? मी त्यांचं काय वाईट केलंय? हे माहीत नाही. पण ते माझं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाने तर मला जिवंतपणे मारलं. त्यातही मी त्याला म्हटलं की मी शेतकऱ्याचा पुत्र आणि तू पण शेतकऱ्याचा पुत्र आहेस. माझ्या चाहत्यांची माफी माग. तर तो म्हणतो की तुझा चाहता वर्ग माझ्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही".
"दुसरी गोष्ट म्हणजे कायम ट्रोलिंग करणं, मी जे काम करतो त्यावर वाईट कमेंट करणं, याला मी कंटाळलेलो आहे. माझ्या शरीरावर तुम्ही बोलताय. आणि माझ्या आईवडिलांना तुम्ही बोलताय. म्हणजे जन्माला येऊन मी चूक केली का असं वाटतंय. तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आणि सांगितलं आहे की जर १० दिवसांत काही झालं नाही. आणि त्या मुलांचं अकाऊंट बॅन झालं नाही. माझी नुकसान भरपाई दिली नाही. तर येत्या १० दिवसांत मी आत्महत्या करणार आहे. कारण, मी आता कंटाळलेलो आहे. माझ्या घरचेसुद्धा कमेंट वाचतात. त्यामुळे यांचा सोक्षमोक्ष लागला नाही तर मी १० दिवसांत आत्महत्या करेन", असा इशारा त्याने दिला आहे.