सध्या पंढरीच्या वारीचे वारे राज्यात वाहत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. सगळीकडे हरीनामाचा गजर ऐकू येत आहे. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही वारीत सहभागी होतात. 'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवारही यंदा विठुरायाच्या वारीत सहभागी झाला होता. मात्र त्याला काहींनी ट्रोल केलं होतं.
धनंजयने वारीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यांच्या या पोस्टवर काहींनी कमेंट केल्या होत्या. "इथून पुढे मटण खाणे सोडा", "रोज मटण खाणारे वारीला आले" अशा आशयाच्या अनेक कमेंट त्याच्या फोटोवर केल्या होत्या. वारीत सहभागी झाल्यामुळे मटण खाण्यावरुन बोललणाऱ्यांनी डीपीने चोख उत्तर दिलं आहे. धनंजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, "काही लोक वारी करताना किंवा देवभक्ती करताना इतरांच्या खाण्या-पिण्यावरुन किंवा व्यवसायावरुन जज करतात. पण असं देव कधीच करत नाही. मटण खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे. पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे".
"वारी शरीराने केली जाते. पण खरी वारी मनातली असते. देव कर्म बघत नाही, भाव बघतो. विठोबा त्याच भक्तासाठी मटण तोडायला आला होता. देवाने भक्ताचा व्यवसाय बघितला नाही...त्याची निष्ठा बघितली. मग तुम्ही कोण की माझी भक्ती नाकारायची? मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्यापिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही. देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही. कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही, मग तुम्ही का करताय? मी मटण खातो, हो. पण रोज विठोबाचं नावंही घेतो. देव माझं हृदय बघतो. थाळीत काय आहे ते नाही. म्हणून मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो", असं त्याने म्हटलं आहे.
"तू भक्त आहेस आणि भक्ती तुझ्या मनातून येते. हे कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. पण तरी कुणी कमी लेखत असेल तर हे उत्तर देणं हे सत्यासाठी उभं राहणं आहे. देव तिथेच आहे जिथे खरं मन आहे. बाकी सर्व लोकांचं बोलणं. वारीनंतर वाऱ्यासारखं उडून जातं", असं म्हणत डीपीने ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे.