Join us

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 10:18 IST

मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे

गेल्या काही महिन्यांपासून कलाविश्वात लगीनसराई सुरू आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक मराठी कलाकारांनीही लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. पूजा सावंत, प्रथमेश परब, शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांच्यानंतर मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता निखिल राजेशिर्केने गुपचूप साखरपुडा केला आहे. 

गुढीपाडव्याचा मुहुर्त गाठत निखिलने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या शुभमुहुर्तावर मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत निखिलने साखरपुडा केला. मोठ्या थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला. कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही त्याच्या साखपुड्याला हजेरी लावली होती. अभिनेत्री रेश्मा शिंदेने निखिलच्या साखरपुड्यातील फोटो शेअर करत त्याला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, निखिलने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवरील तो लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रेटी वेडिंग