Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 18:38 IST

सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात झापूक झुपूक एन्ट्री घेतली होती. गोलीगत धोका म्हणत बुक्कीत टेंगूळ देणाऱ्या सूरजला बिग बॉसच्या घरात पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण, सूरजने त्याच्या वागणुकीने आणि खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. आता सूरज बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले वीकमध्ये आहे. 

सूरजला त्याच्या चाहत्यांकडून भरपूर पाठिंबा मिळत आहे. सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे. व्हिडिओ शेअर करत सुरेखा कुडची यांनी चाहत्यांना सूरजला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे. "आपला पॅडी या आठवड्यात बाहेर पडलाय. आता फिनाले वीक सुरू आहे. आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी सूरज चव्हाण याने जिंकावी. सूरज जर तू बाहेर ट्रॉफी घेऊन आलास तर मला मनापासून आनंद होईल. पण, अख्खा महाराष्ट्र तू ट्रॉफी घेऊ कधी बाहेर येतोस, याची वाट बघतोय. तुझ्याकडून खूप आशा आहेत. तू ट्रॉफी घेऊनच बाहेर यावंस, अशी माझी मनापासून इच्छा आहे", असं त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.  

पुढे त्या म्हणतात, "अंकिता, वर्षाताई आणि अभिजीत हे सदस्यही मला आवडतात. निक्कीला फिनालेचं पहिलं तिकीट मिळालं. ते तिकीट घेऊनच तिने खूश राहावं. ट्रॉफीपर्यंत तुला आम्ही जाऊ देणार नाही. सूरज चव्हाण ऑल द बेस्ट आणि ट्रॉफी घेऊनच बाहेर ये". 

 या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यातही एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. आता बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार