बिग बॉस मराठीच्या घरामधून जुई गडकरी घराबाहेर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 09:21 IST
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील ...
बिग बॉस मराठीच्या घरामधून जुई गडकरी घराबाहेर !
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, सई लोकूर आणि आस्ताद काळे हे डेंजर झोनमध्ये आले, आणि जुईला घराबाहेर जावं लागलं. जुई घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, भूषण खूप भावुक झाले. नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी जुईला देखील मिळाली. जुईने या वेळेस तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकेंडचा डावमध्ये सदस्यांनी एकमेकांना गर्विष्ठ, दलबदलू, सांगकाम्या, बोरिंग अशी नावे असलेला मुकुट बहुमताने बहाल करायचा होता. सई लोकूरला गर्विष्ठ, उषा नाडकर्णी यांना दलबदलू, पुष्कर याला सांगकाम्या तर जुईला बोरिंग असे नाव असलेला मुकुट देण्यात आला. महेश मांजरेकर यांनी सदस्यांचे दोन गट पाडले ज्याचे कॅप्टन पुष्कर आणि रेशम यांना केले. ज्यामध्ये दोन्ही गटांना एक स्कीट तयार करायचे आहे. जो गट जिंकेल त्यांना एक गिफ्ट देण्यात येणार असून महेश मांजरेकर स्वत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला प्राईझ देणार आहेत असे सांगितले. तेव्हा पुढील आठवड्यामध्ये कळेलच कोण या टास्क मध्ये बाजी मारेल. या आठवड्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये नव्हे तर एका वेगळ्या पद्धतीने महेश मांजरेकर यांनी कोण घरातून बाहेर जाणार हे सांगितले. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी नॉमिनेटेड सदस्यांच्या निगडीत तीन प्रश्न इतर सदस्यांना विचारले, जर उत्तर बहुमताने हो आलं तर पहिल्या प्रश्नाला कारल्याचा जूस, दुसरा प्रश्नाचं उत्तर हो आलं तर पिठामध्ये तोंड घालायचे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो आलं तर एक ठोसा मारायचा. अशा वेगळ्या पद्धतीने हे कार्य पार पाडले. जुई गडकरी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. तिला एक विशेष अधिकार देण्यात आला आणि तो म्हणजे जुई कोणा एका सदस्याला पुढच्या एका आठवड्यासाठी शिक्षा देऊ शकते मग ती कुठलीही शिक्षा असेल त्या सदस्याला ती पूर्ण करणे भाग असेल. जुईने सईला शिक्षा दिली पुढील एक आठवडा कॉफी न पिण्याची. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.