Bigg Boss 19: बिग बॉस १९ ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सीझनमधील अनेक स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत. तसंच नेहमीप्रमाणे सलमान खानचा 'वीकेंड का वार'ही गाजत आहे. सलमान खानला (Salman Khan) अनेक महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच तो बिग बॉस आणि सिनेमांचंही शूट करत आहे. त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटलाही बुलेटप्रुफ ग्लास लावला आहे. तर आता बिग बॉस १९ च्या सेटवरही सुरक्षाव वाढवण्यात आली आहे. सलमानच्या जीवाला धोका असल्याने या सीझनमध्ये लाईव्ह ऑडियन्सही दिसत नाहीयेत.
बिग बॉसचे निर्माते ऋषी नेगी यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. ते म्हणाले, "बिग बॉस १९ साठी जवळपास ६०० लोकांचा क्रू आहे. या लोकांसाठी आम्ही ३ शिफ्ट्स ठेवल्या आहेत जेणेकरुन २४ तास काम सुरु राहील. सेटवर महिला आणि पुरुष यांची समान संख्या राहील असाही प्रयत्न केला आहे. सुरक्षेसाठी आम्ही मोठी तयारी केली आहे. गेल्या अडीच वर्षात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे भाईजानला मिळणाऱ्या सततच्या धमक्या. जेव्हा सलमान सेटवर असतो तेव्हा आम्ही लाईव्ह ऑडियन्सलाही बोलवत नाही. तसंत सेटवर कोण असेल आणि कोण नाही याचेही निर्देश दिलेले असतात. आम्ही शोसाठी ज्या कोणाला कास्ट करतो त्याची आधी संपूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री तपासतो."
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. त्याच्या बांद्रा येथील घरावर गेल्यावर्षी गोळीबारही झाला. यानंतर त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली. सलमान सध्या बुलेटप्रुफ कारमधूनच फिरतो. एकंदर भाईजानच्या सुरक्षाव्यवस्थेमुळे त्याला सहजासहजी भेटणं आता कोणालाही शक्य होत नाही.