'बिग बॉस १९' धमाक्यात सुरु झालं आहे. तान्या मित्तल, फरहाना, प्रणित मोरे. अमाल मलिकसह अनेक स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठमोळा प्रणित भाव खाऊन जात आहे. स्पर्धकांवर त्याने केलेले जोक्स तर तुफान गाजले. नुकतंच शोमध्ये अभिनेत्री काजोल तिच्या 'द ट्रायल सीझन २' सीरिजच्या प्रमोशनसाठी आली होती. तेव्हा काजोलने प्रणित मोरेला पाहून सलमान खानला 'हा कोण?' असा प्रश्न विचारला. यावर सलमानने दिलेलं उत्तर ऐकून ती शॉक झाली.
अभिनेत्री काजोलच्या 'द ट्रायल' सीरिजचा सीझन नुकताच हॉटस्टारवर आला आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्ताने ती सहकलाकार जिशू सेनगुप्तासोबत बिग बॉसमध्ये आली होती. यावेळी काजोलने स्टेजवरुनच सलमान खानला स्पर्धकांना बघायचं असल्याची विनंती केली. नंतर स्क्रीनवर घरातला व्हिडिओ लावण्यात आला. तेव्हा आधी तान्या मित्तल दिसली. तान्या किती श्रीमंत आहे, तिचा काय काय बिझनेस आहे याबद्दल सलमानने माहिती दिली. तेव्हा काजोल गंमतीत म्हणाली,'हिचा टेलर कोण आहे? नंबर घ्याला लागेल'. हे ऐकून सलमानही हसला.
नंतर समोर प्रणित मोरे दिसला. काजोलने विचारलं, 'हा कोण आहे?' यावर सलमान म्हणाला, 'हा स्टॅण्डअप कॉमेडियन आहे. त्याने माझ्यावर आडवे तिडवे बरेच जोक मारले आहेत'. काजोल शॉक होऊन म्हणते, 'काय? म्हणजे याने आमच्यावरही जोक केले असतील'. तर सलमान म्हणतो, 'याचे सगळे जोक माझ्यावरच असतात. याचं घरच माझ्यावर चालत आहे. म्हणून मी म्हटलं ठिके, करु दे'.
प्रणित मोरेने याआधी त्याच्या स्टॅण्डअप शोमध्ये सलमान खानची खिल्ली उडवली आहे. त्याचे तेच जुने व्हिडिओ सलमानने पाहिले. वीकेंड का वारमध्ये सलमानने प्रणितला त्यावरुन बरेच उपदेश केले होते. तसंच सलमान अजूनही ते सगळं विसरलेला नाही असंच दिसत आहे. सध्या बिग बॉस १९ मध्ये चांगलंच मनोरंजन सुरु आहे.