Salman Khan Advice To Pranit More : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले काल रात्री पार पडला. गौरव खन्ना या शोचा विजेता ठरला, तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. तिसऱ्या क्रमांकावर मराठमोळा प्रणित मोरे बाद झाला. शोच्या टॉप-५ मध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि अमाल मलिक यांनी बाजी मारली. मात्र, तिसऱ्या नंबरवर प्रणित मोरे एविक्ट झाला. प्रणित मोरे शोच्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. प्रणित बाहेर येताच सलमान खाननं त्यांच्या खेळाचं कौतुक केलं. तसेच त्याला एक मोलाचा सल्लाही दिला.
बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसमोर प्रणितने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "मला कधीही वाटलं नव्हतं की अशाप्रकारच्या शोमध्ये कधी येईल. पहिले दोन आठवडे तर मला तर असं वाटलं की जितक्या लवकर मी बाहेर जाईल, तितकं चांगलं राहिलं. पण, हळुहळु मला बिग बॉसच्या घरातील लोकांचं वागणं समजू लागलं आणि प्रत्येकवेळेस नॉमिनेशमध्ये येऊनही मी वाचलो. तेव्हा मला वाटलं की लोक जर एवढं प्रेम देत आहेत, तर मीदेखील प्रयत्न केले पाहिजेत. भांडण तर मी कधीही करणार नव्हतो. मग मी प्रणित मोरे शो सुरू केला. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनीदेखील खूप प्रेम दिलं. प्रवास खूपचं चांगला होता".
यावेळी सलमान खाननं प्रणितला सल्ला देत म्हटलं की, "तुझ्या आई-वडिलांना तुझा खूप अभिमान आहे, त्यांच्या डोळ्यात ते दिसतंय. फक्त एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेव. कधीही "द प्रणित मोरे शो" आता फ्री मध्ये करू नकोस". दरम्यान, यंदा 'बिग बॉस' हिंदीच्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेझ निर्माण झाली. त्याला चाहते 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून देखील ओळखतात.