Join us
Daily Top 2Weekly Top 5

या प्रश्नामुळे भडकला सिद्धार्थ शुक्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:54 IST

दिल से दिल तक या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला प्रमुख भूमिका साकारत होता. पण या मालिकेला नुकताच त्याने रामराम ठोकला. ...

दिल से दिल तक या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला प्रमुख भूमिका साकारत होता. पण या मालिकेला नुकताच त्याने रामराम ठोकला. त्याने ही मालिका सोडली नसून त्याला या मालिकेमधून काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.  सिद्धार्थ शुक्लाने दिल से दिल तक या मालिकेचे चित्रीकरण कोणत्या ना कोणत्या कारणांनी अनेकवेळा थांबवून ठेवले असल्याने या मालिकेतून त्याला काढण्यात आले अशी चर्चा होती. त्यामुळे यावर एका पत्रकाराने सिद्धार्थला नुकताच प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून तो प्रचंड भडकला आणि माइक काढून निघून गेला असे म्हटले जात आहे. एका वेबसाइटच्या वृत्ताच्यानुसार सिद्धार्थमुळे अनेकवेळा या मालिकेचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवावे लागले होते. रश्मी देसाई या मालिकेत सिद्धार्थसोबत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिची व्हॅनिटी सिद्धार्थपेक्षा मोठी असल्याने सिद्धार्थने यावर प्रोडक्शन टीमला तक्रार केली होती आणि जोपर्यंत तिच्यापेक्षा मोठी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करणार नाहीत, तोपर्यंत चित्रीकरण करायचे नाही असे ठरवले होते. तसेच एकदा व्हॅनिटी व्हॅनमधील मायक्रोव्हेव्ह बंद झाल्याने त्याने चित्रीकरण काही तासांसाठी थांबवले होते असे या वेबसाइटने म्हटले आहे. या सगळ्या कारणांमुळे शोच्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी सिद्धार्थची तक्रार कलर्स वाहिनीच्या मंडळींकडे केली होती आणि त्यावेळी एक मिटिंगदेखील घेण्यात आली होती. पण या मिटिंगला सिद्धार्थ उपस्थित राहिला नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळेच त्याला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला असे वेबसाइटने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. सिद्धार्थ या मालिकेत पार्थ भानुशाली ही भूमिका साकारत होता. त्याची जागा आता मनीष रायसिंघानिया घेणार असल्याची चर्चा आहे. मनिषने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच त्याचे कलर्स वाहिनीच्या लोकांसोबत चांगले संबंध असल्याने त्याची या भूमिकेसाठी निवड कऱण्यात आली असल्याची चर्चा आहे.