Join us

"तू असल्याने जगण्याला अर्थ आहे...", शशांक केतकरने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 14:48 IST

Shashank Ketkar : शशांक केतकरने २०१७ साली प्रियांकासोबत लग्न केले. आज अभिनेत्याच्या पत्नीचा वाढदिवस असून त्याने त्यानिमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' (Muramba) मालिकेत अक्षयच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. यातील अक्षय आणि रमाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. शशांक केतकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असून त्याचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याचे चाहते त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल बऱ्याचदा सांगताना दिसतो. दरम्यान आज त्याची पत्नी प्रियंका केतकर हिचा वाढदिवस असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

शशांक केतकरने इंस्टाग्रामवर पत्नी प्रियंकासोबतच्या फोटोंचा कोलाज असलेला व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तू असल्याने जगण्याला अर्थ आहे , नाहीतर हसणेही व्यर्थ आहे. हॅप्पी बर्थडे बायको. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसोबत चाहतेदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

शशांक केतकरने २०१७ साली प्रियांकासोबत लग्न केले. प्रियांकाने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात शशांक आणि प्रियांकाला पुत्ररत्न प्राप्ती झाली. शशांकने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद ठेवले आहे. मुलाच्या जन्मानंतर आता साधारण सहा महिन्यांनी प्रियांकाने स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. रेनबो ट्विंकल्स या नावाने तिने स्वतःचे आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे. 

टॅग्स :शशांक केतकर