कलश एक विश्वास घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:01 IST
कलश एक विश्वास या मालिकेला प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच ही मालिका टिआरपी रेसमध्येदेखील अव्वल ठरत आहे. ...
कलश एक विश्वास घेणार प्रेक्षकांचा निरोप
कलश एक विश्वास या मालिकेला प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच ही मालिका टिआरपी रेसमध्येदेखील अव्वल ठरत आहे. पण तरीही या मालिकेला निरोप देण्याचे लाइफ ओके वाहिनीने ठरवले आहे. या वाहिनीवर पुढील काळात पुरुषप्रधान मालिका येणार असल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला असल्याची चर्चा आहे. या वाहिनीवर आता शेर-ए-पंजाबः महाराजा रंजितसिंग, यारियाँ यांसारख्या नव्या मालिका सुरू होणार आहेत. कलश एक विश्वास या मालिकेत क्रिप सुरी आणि अपर्णा दिक्षित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका 17 मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ही बातमी ऐकून या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. कलश ही मालिका गेल्या वर्षी सुरू झाली होती. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची बातमी नुकतीच या मालिकेच्या टीमला सांगण्यात आली. यामुळे मालिकेच्या सेटवर सगळे कलाकार आणि टीमला धक्काच बसला आहे. त्या दिवसापासून सेटवरील सगळ्यांचा मूड खूप खराब आहे. कारण या मालिकेची टीम नुकतीच 500 भाग पूर्ण करणार होती आणि त्यामुळे या मालिकेतील सगळेच जण खूप खूश होते. सेलिब्रेशनच्या विचारात असताना त्यांना ही बातमी मिळाली आहे.कलश या मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफ्लिम्सने केली आहे. अनेक वर्षांपूर्वीदेखील याच नावाने एकता कपूरने एका मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत अमर उपाध्याय, डॉली सोही यांच्या प्रमुख भूमिका होत्या. डॉलीने कलश एक विश्वास या मालिकद्वारे अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.