Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामायणामध्ये विविध भूमिका साकारणारे असलम खान अभिनयक्षेत्रापासून दूर राहून आता करतात हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:13 IST

असलम खान यांनी अनेक वर्षांपूर्वीच अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला आहे.

ठळक मुद्देअसलम सांगतात, त्यानंतर मी रामायणात विविध भूमिका साकारल्या. रामायण या मालिकेनंतर देखील मी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण २००२ नंतर काहीही काम मिळत नसल्याने अखेरीस मी मुंबई सोडली आणि माझ्या गावी झांसीला आलो. तिथे मी मार्केटिंगचे काम करतो.

रामानंद सागर यांचे रामायण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. रामायणात भूमिका साकारणारे कलाकारही तितकेच चर्चेत आहेत. अगदी मालिकेतील प्रत्येक कलाकाराला शोधले जात आहे. राम, रावण, सीता, लक्ष्मण, भरत, कैकयी, दशरथ अशा अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा शोध सुरू आहे. अशात रामायण मालिकेतील एक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. हा कलाकार कोण तर अभिनेता असलम खान. असलम खान यांनी रामायण मालिकेत अनेक साईड रोल साकारले. कधी ते ऋषी बनले, कधी मुनी, कधी दूत, कधी राक्षस, कधी समुद्र देव तर कधी वानर सेनेतील वानर.

असलम खान यांच्यावर सध्या सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले जात आहेत. सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. हे प्रेक्षकांचे आवडते असलम खान सध्या कुठे आहेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असलम खान एकेकाळी प्रचंड प्रसिद्ध असले तरी त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला आहे. 

असलम खान यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर आता त्यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे की, मी मुळचा उत्तर प्रदेश मधील झांसीचा असलो तरी मी अनेक वर्षं मुंबईतच राहिलो आहे. मी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका ठिकाणी अकाऊंटट म्हणून नोकरी करत होतो. मी माझ्या बिल्डिंगमधील एका व्यक्तीसोबत एक स्टेज शो पाहायला गेलो होता. तिथे त्यांनी माझी रामानंद सागर यांच्यासोबत ओळख करून दिली. त्यांनी मला विक्रम बेताल मध्ये काम करण्याची संधी दिली आणि तिथून माझ्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली. 

पुढे असलम सांगतात, त्यानंतर मी रामायणात विविध भूमिका साकारल्या. रामायण या मालिकेनंतर देखील मी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण २००२ नंतर काहीही काम मिळत नसल्याने अखेरीस मी मुंबई सोडली आणि माझ्या गावी झांसीला आलो. तिथे मी मार्केटिंगचे काम करतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या माझे सोशल मीडियावर मीम्स बनत आहेत हे पाहून मला प्रचंड आनंद होत आहेत. त्या काळात सोशल मीडिया असती, तर मी खूपच प्रसिद्ध झालो असतो असे मला वाटते. 

टॅग्स :रामायण