Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अशोक शिंदे दिसणार दुहेरी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:04 IST

दुहेरी या मालिकेच्या कथानकाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील दोन बहिणींची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावते. या कार्यक्रमात ...

दुहेरी या मालिकेच्या कथानकाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील दोन बहिणींची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावते. या कार्यक्रमात सुनील तावडे, निवेदिता सराफ, तुषार दळवी, रविंद्र मंकणी यांसारखे मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज काम करत आहेत. या मालिकेतील रविंद्र मंकणी यांची भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडते. पण काही दिवसांपूर्वी रविंद्र मंकणी यांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला. ते या मालिकेत बलवंत बल्लाळ हे भूमिका साकारत होते. त्यांनी ही मालिका सोडल्यानंतर बलवंत बल्लाळ या भूमिकेत कोण झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या मालिकेत रविंद्र मंकणी यांची जागा अशोक शिंदे घेणार असल्याचे कळतेय. अशोक शिंदे यांनी या मालिकेसाठी चित्रीकरण करायलादेखील सुरुवात केली आहे. दुहेरी या मालिकेत लवकरच बलवंत बल्लाळ या व्यक्तिरेखेची रिएंट्री होणार आहे. परसू हा सूर्यवंशी या कुटुंबासाठी खलनायक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण परसू हा खरा खलनायक नसून त्याच्यामागचा सूत्रधार हा कोणीतरी वेगळाच आहे. परसूचा प्यादा म्हणून वापर करून सूर्यवंशी कुटुंबाचे वाईट इच्छिणारा बलवंत बल्लाळ आहे. तो सगळ्या गोष्टींचा सूत्रसंचालक आहे. त्यामुळे या मालिकेत बलवंत बल्लाळ ही भूमिका खूपच महत्त्वाची आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.अशोक शिंदेने काही दिवसांपूर्वी माझे पती सौभाग्यवती या मालिकेत काम केले होते. तसेच अशोक रणरागिणी, माझे घर तुझा संसार, काल रात्री बारा वाजता यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे.