Arvind Trivedi: साल १९८७ च्या काळात दूरचित्रवाणीवर 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पहिल्यांदा प्रसारित करण्यात आली. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या मालिकेने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. दुरचित्रवाणीच्या इतिहासात प्रचंड लौकिक मिळवणारी ही एकमेव मालिका होती. या मालिकेत रावणाच्या भूमिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी. 'रामायण' मध्ये त्यांनी रावणाचं पात्र पडद्यावर जिवंत केलं. इतकी वर्ष उलटूनही लोकांच्या अजूनही त्यांचा तो मोठा आवाज आणि त्यांची चालण्याची शैली स्मरणात आहे. त्यांनी साकारलेल्या रावण पाहून लोक तिरस्कार करु लागले होते.ज्या वेळी टीव्हीवर रामायण सुरु व्हायची तेव्हा अक्षरश: रावणाला पाहण्यासाठी झुंबड उडायची. २०२१ मध्ये आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे अरविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी होत गेले. ६ ऑक्टोबर २०२१ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९३८ ला इंदौर येथील एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील जेठालाल त्रिवेदी हे गिरणी कामगार होते. त्यांनी गुजराती रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी १९७१ मध्ये 'पराया धन' या चित्रपटातून हिंदी सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ते जंगल में जंगल , आज की ताजा खबर या चित्रपटांमध्येही झळकले. याशिवाय अरविंद त्रिवेदी 'विक्रम और बेताल', 'विश्वामित्र' आणि 'भक्त गोरा कुंभार' या मालिकांसाठी देखील ओळखले जातात.
अरविंद त्रिवेदी यांनी आपल्या अभिनय प्रवासात वेगवेगळ्या भाषांमधील मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, 'हम तेरे आशिक है' या चित्रपटामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटात हेमा मालिनी देखील मुख्य भूमिकेत होत्या.या चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांना हेमा मालिनी यांना जोरदार कानाशिलात मारायची होती. मात्र, तो सीन ते करु शकत नव्हते. 'हम तेरे आशिक है' मध्ये तो सीन करताना अरविंद त्रिवेदी प्रचंड घाबरले होते. त्या एका सीनसाठी त्यांनी तब्बल २० टेक घेतले होते. पण, अखेरीस २० टेकनंतर तो सीन शूट झाला.हा किस्सा रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेम सागर यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.