अनुराग बासूला सुपर डान्सर २च्या सेटवर मिळाले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 13:03 IST
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. ...
अनुराग बासूला सुपर डान्सर २च्या सेटवर मिळाले सरप्राईज
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. देशभरातील अतिशय प्रतिभावान स्पर्धकांमुळे स्पर्धेने वेगळीच पातळी गाठली आहे. या कार्यक्रमाचा प्रवास आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे कोणते स्पर्धक बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमात अनुराग बासू, शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर अनुराग बासूला त्याच्या मुलींकडून नुकतेच खूप छान सरप्राईज मिळाले. अनुरागला दोन मुली असून त्याच्या दोन्ही मुलींना कॅमेर्यासमोर यायला आवडत नाही. पण तरीही त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी एक व्हिडिओ टेप नुकतीच बनवली आणि ही टेप सुपर डान्सर या कार्यक्रमात नुकतीच दाखवण्यात आली. या व्हिडीओत त्या दोघी अनुरागबद्दल बोलताना दिसल्या. ही टेप पाहून अनुराग चकितच झाला. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या वडिलांविषयी अनेक सिक्रेट्स सगळ्यांसोबत शेअर केले. त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले की, अनुरागला बाहेर जाऊन पार्टी करण्याऐवजी मुलींसोबत वेळ घालवायला अधिक आवडते. तो स्वयंपाक करण्यासोबतच घरातील सगळी कामे करायला देखील तयार असतो. तो दोघींनाही रोज रात्री झोपण्यापूर्वी विविध गोष्टी सांगतो. तसेच तो रोज सकाळी आपल्या मुलींना शाळेत सोडायला देखील जातो. हे सगळे ऐकून अनुराग भावुक झाला होता. त्याने सांगितले, माझी पत्नी दुसर्या मुलीच्या वेळी गरोदर होती, तेव्हा मला कर्करोग झाल्याचे समजले होते. तिला सातवा महिना सुरू होता. मी या आजारातून वाचेल का याची देखील शक्यता नव्हती. केवळ माझ्या मुलीचा चेहरा मला पाहायचा आहे ही इच्छा मी मनात ठेवली होती. या इच्छेमुळेच मला कॅन्सरशी लढा देण्याचे बळ मिळाले.अनुराग बासूच्या मुली कॅमेर्यासमोर यायला सहसा तयार होत नाहीत. जेव्हा त्याच्या मुलींनी त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा तो खूपच खूश झाला. हा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही असे त्याने सगळ्या उपस्थितांना सांगितले. Also Read : राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला ठेवले आहे हे नाव