Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतच्या अंतिम संस्काराला गेली नव्हती अंकिता लोखंडे, 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "त्यावेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 10:12 IST

Bigg Boss 17 : पुन्हा एकदा अंकिता सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

'बिग बॉस १७' दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. या पर्वात मराठमोळी अंकिता लोखंडे सगळ्यांची मनं जिंकून घेत आहे. अंकिता पती विकी जैनसह बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत. दमदार खेळीने ते दोघेही 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 'बिग बॉस'च्या घरात अनेकदा अंकिता एक्स बॉफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबाबत बोलताना दिसली. आता पुन्हा एकदा अंकिता सुशांतच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

मुन्नवर फारुकीबरोबर बोलताना अंकिताने सुशांत सिंग राजपुतच्या अंतिम संस्कारासाठी न गेल्याचा खुलासा केला. 'बिग बॉस'च्या घरातील अंकिताचा सुशांतबद्दल बोलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मुन्नवर 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील कौन तुझे हे गाणं बोलताना दिसत आहे. त्यानंतर मुन्नवर अंकिताला म्हणतो, "मी सुशांतबरोबर यशराज स्टुडिओमध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग बघितलं होतं. फक्त एकदाच मी त्यांना भेटलो."

त्यावर अंकिता पुढे म्हणते, "तो खूप चांगला व्यक्ती होता. तो आता नाहीये हे बोलताना कधी कधी वेगळं वाटतं. आता तरी गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत. पण, सुरुवातीला खूप विचित्र वाटायचं. सुशांत विकीचा पण मित्र होता. त्यामुळे तो नाही, हे बोलताना खूप वेगळं वाटायचं." त्यानंतर मुन्नवर अंकिताला त्याच्याबरोबर नेमकं काय चुकिचं घडलं? असं विचारतो. त्यावर अंकिता त्याला मला याबाबत बोलायचं नाही असं सांगते. 

"मला हे विचारायचं नाहीये. पण, प्रत्येक माणूस काहीतरी वेगळं बोलतो. पण, एक तूच अशी आहेस जिला सगळं माहीत आहे," असं मुन्नवर अंकिताला म्हणतो. तेव्हा अंकिता सुशांतच्या अंतिम संस्काराला गेली नसल्याचा खुलासा करते. "तेव्हा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. जवळच्या माणसाला गमावणं हा माझा पहिलाच अनुभव होता. म्हणून मी त्याच्या अंतिम संस्कारालाही गेले नव्हते. विकी मला म्हणाला होता की तू जाऊन ये. पण, मला माहीत होतं की मी ते सगळं पाहू शकत नव्हते. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना तसं बघितलं. मिस यू डॅडी," असं अंकिता भावुक होत म्हणते. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉससुशांत सिंग रजपूत