क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत झळकणार आहे. करिश्माने कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, बालवीर यांसारख्या मालिकेत काम केले आहे. गेल्या दोन वर्षांत ती कोणत्याच मालिकेत दिसली नव्हती. कारण तिने मालिकांपेक्षा रिअॅलिटी शोंना जास्त वेळ द्यायचे ठरवले होते. पण आता दोन वर्षांनंतर ती मालिकेकडे वळत आहे. नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत ती एका नागाची भूमिका साकारणार आहे. अस्तिका म्हणजेच निकितन धीरचा बदला घेण्यासाठी ती येणार आहे. याविषयी करिश्मा सांगते, "मी दरम्यानच्या काळात मालिका केल्या नसल्याने मला मालिका करायच्या नाहीत असेच अनेकजणांना वाटत होते. पण तसे काहीही नाही. मला मालिका करायला नक्कीच आवडतील. पण सध्या मी भूमिका अतिशय चोखंदळपणे निवडत आहे. त्यामुळे मी खूपच कमी पण चांगल्या मालिकांमध्ये काम करत आहे."करिश्मा काही महिन्यांपूर्वी तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिचे सूत अभिनेता उपेन पटेलशी जुळले होते. उपेन आणि ती अनेक कार्यक्रमांना, पार्टींना एकत्र हजेरी लावत असत. तसेच ते भारताबाहेरील अनेक ठिकाणी फिरायलादेखील जात असत. तसेच नच बिलिये 7मध्येदेखील ती उपेनसोबत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. उपेन आणि करिश्माचे फॅन प्रेमाने त्यांना उपमा असे म्हणत असत. हे दोघे लग्नबंधनात अडकतील असे सगळ्यांनाच वाटत होते. पण काहीच महिन्यांपूर्वी त्या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले. करिश्माने आता तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
और एक नागिन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:59 IST